Rickey Kej Grammy: कलाजगतात भारतीय चित्रपट वर्तुळ आणि भारतीय कलाकारांचाच डंका आहे. यातच आता पुन्हा एकदा आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. हे नाव आहे रिकी केज. 2023 या वर्षासाठीच्या ग्रॅमी पुरस्कारांनी नुकतीच घोषणा करण्यात आली असून, यामध्ये पुन्हा भारताची मान अभिमानानं उंचावली आहे. कारण, बंगळुरूच्या रिकी केज या प्रतिष्ठीत संगीतकारानं तिसऱ्यांना ग्रॅमी जिंकला आहे. 'डिवाइन टाइड्स' या अल्बमसाठी त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. रिकीच्या वाट्याला आलेलं हे यश भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवणारं ठरत आहे.
Just won my 3rd Grammy Award. Extremely grateful, am speechless! I dedicate this Award to India.@copelandmusic
Herbert Waltl Eric Schilling Vanil Veigas Lonnie Park pic.twitter.com/GG7sZ4yfQa
— Ricky Kej (@rickykej) February 6, 2023
'नुकताच मी तिसऱ्यांना ग्रॅमी पुरस्कार जिंकला. या क्षणासाठी मी सदैव ऋणी राहीन. सध्या मला शब्दच सुचत नाहीयेत. माझा हा पुरस्कार भारताला समर्पित....', असं लिहीत रिकीनं पुरस्कार जिंकल्यानंतरचा त्याचा आनंद व्यक्त केला. सोबतच त्यानं काही फोटोही शेअर केले. एका क्षणात रिकीच्या या ट्विटनं अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. किंबहुना रिकी सोशल मीडियावर ट्रेंडही करु लागला.
रिकीनं त्याचा हा पुरस्कार ब्रिटिश रॉक बँड द पुलिस चा प्रसिद्ध ड्रमर स्टीवर्ट कोपलँड याच्यासोबत शेअर केला. त्यानं रिकीला या अल्बमचं काम पूर्ण करण्यात मोठी मदत केली होती. 'बेस्ट इमर्सिव ऑडिओ' या विभागातून त्याला हा पुरस्कार मिळाला. रिकीनं सर्वप्रथम 2015 मध्ये 'विंड्स ऑफ समसारा' या अल्बमसाठी ग्रॅमी जिंकून इतिहास रचला होता. त्याला मिळालेला हा बहुमान भारतासाठीसुद्धा तितकाच महत्त्वाचा होता.
रिकीच्या नावे एक अनोखा विक्रम आहे. आतापर्यंत त्यानं संगीत क्षेत्रात तब्बल 100 पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. तर, जगातील जवळपास 30 देशांमध्ये त्यानं आपली कला सादर केली आहे.