नागराजच्या 'नाळ'ची बॉलिवूडला टक्कर

'नाळ'ने पटकावलं अव्वल स्थान

नागराजच्या 'नाळ'ची बॉलिवूडला टक्कर  title=

मुंबई : सैराट आणि फँड्रीच्या अभुतपूर्व यशानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे निर्मितीच्या माध्यमातून एक नवी कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आला. 16 नोव्हेंबर रोजी नागराज मंजुळे निर्मित 'नाळ' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. आणि पुन्हा एकदा मराठी सिनेमाची जादू बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळाली. 

100 कोटीचा आकडा बॉक्स ऑफिसवर पार करणारा 'सैराट' हा सिनेमा ठरला आहे. यानंतर आता नागराज निर्मिती आणि अभिनय करून 'नाळ' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला आहे. 

'नाळ' या सिनेमाने बॉलिवूडला देखील टक्कर दिली आहे. 2018 च्या अखेरीला बॉलिवूडचे बिग बजेट आणि बिग स्टारर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये किंग खानचा 'झिरो', रोहित शेट्टीचा 'सिम्बा' आणि प्रदर्शनाच्या सुरूवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला 'केदारनाथ' या सिनेमांचा समावेश आहे. 

या सिनेमांना टक्कर देत नागराज मंजुळेच्या 'नाळ' ने अव्वल स्थान पटकावलं आहे. 'आयएमबीडी'च्या यादीत नागराजच्या 'नाळ'ने सातवा क्रमांक पटकावला आहे. यामुळे मराठी प्रेक्षकांसाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे. 

नागराज मंजुळेने आतापर्यंत 'फँड्री', 'सैराट' आणि आता 'नाळ'मध्ये लहान मुलांच भावविश्व उलघडलं आहे. नागराजच्या सिनेमातील वेगळेपण म्हणजे अभिनय क्षेत्राचा गंध देखील नसलेले नवखे कलाकार आणि त्यानंतर त्या कलाकारांनी पटकावलेला 'राष्ट्रीय पुरस्कार'. नागराज मंजुळे आणि राष्ट्रीय पुरस्कार हे आता समीकरणच झालं आहे. 

'चैत्या' या लहान मुलाच्या नजरेतून नागराजने नाळ हा सिनेमा साकारला आहे. सैराट या सिनेमाचे कॅमेरामन सुधाकर रेड्डी यांची ही नाळ कथा असून त्यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.