Israel Hamas War News : इस्रायल आणि हमासमध्ये अनेक दिवसांपासून पेटलेली युद्धाची ठिणगी दिवसागणित वणव्यात रुपांतरित झाली आणि पाहता पाहता हा वणवा आणखी भडकला. अनेक दिवसांपासून सुरु असणारा हा संघर्षसुद्धा अद्याप थांबलेला नाही. अशा या संघर्षामध्ये एका कलाकारानंही आपला जीव धोक्यात घातल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आणि चाहत्यांची चिंता दुपटीनं वाढली.
इदान अमेदी (Idan Amedi) असं या अभिनेत्याचं नाव असून, नेटफ्लिक्सवरील 'फौदा' सीरिजमुळं तो प्रकाशझोतात आला होता. सोमवारी गाझा पट्टीच्या खान युनिसमध्ये हमासच्या दहशतवाद्यांविरोधात इस्रायलचच्या लष्कराकडून हल्ला करण्यात आला. त्याचवेळी लष्कराचा भाग असणाऱ्या इदान अमेदीला गंभीर दुखापत झाली. 'द टाईम्स ऑफ इस्रायल'नं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध करत इदानला तातडीनं उपचारांसाठी रुग्णालयात एअरलिफ्ट करण्यात आल्याचं सांगितलं.
अमेदीचे कुटुंबीय, त्याच्या वडिलांकडून त्याच्या दुखापतीच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला. अभिनेत्याच्या भावानंही सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट करत तो दुखापतग्रस्त असल्याचं सांगत त्याच्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन चाहत्यांना केलं.
इदानच्या दुखापतीसंदर्भाील माहिती राजकीय वर्तुळापर्यंत पसरली आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या प्रकृतीसाठी अनेकांनीच प्रार्थना केल्याचं पाहायला मिळालं. 'फौदा' या सीरिजमुळं प्रसिद्धीझोतात आलेला इदान इस्रायल डिफेंस फोर्स युनिटमध्येही सेवेत असून, वेस्ट बँक आणि गाझापट्टीमध्ये होणाऱ्या लष्करी कारवायांमध्ये तोसुद्धा कर्तव्य बजावताना दिसतो.
35 वर्षीय इदानचा जन्म जेरुसलेम येथे झाला असून, तो कायमच आपल्या गीतांमधून, कलेच्या सादरीकरणातून आपल्या संस्कृतीला जगासमोर मांडताना दिसतो. सध्या इदानची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आल्यामुळं चाहत्यांमध्ये कमालीची चिंता पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून इदाननं कायमच आपल्या कमाबद्दल आणि देशाबद्दलची सद्यस्थिती जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे अशा या अभिनेत्याच्या प्रकृतीकडे सर्वजण सध्या लक्ष ठेवून आहेत.