झी मराठीवर 'फास्टर फेणे' चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर २४ जूनला

या दिवशी असणार प्रीमिअर शो

झी मराठीवर 'फास्टर फेणे' चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर २४ जूनला title=

मुंबई : झी स्टुडिओज प्रस्तुत ‘फास्टर फेणे’ या चित्रपटाने त्याच्या प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर धूम उडवून दिली. शेरलॉक होम्स, व्योमकेश बक्शी या इंग्रजी व हिंदीमध्ये प्रसिद्ध झालेल्या गुप्तहेरांनी रसिकांवर नेहमीच मोहिनी घातली. यानंतर भा. रा भागवत यांनी फास्टर फेणेच्या माध्यमातून मराठमोळा हिरो वाचकांपुढे आणला. त्यांच्या या कलाकृतीला रसिकांनी डोक्यावर घेतले. लहानथोरांना याचे वेड लागले. अमेय वाघ या अभिनेत्याने साकारलेल्या फास्टर फेणेचं लहान मुले, तरूण वर्गाने कौतुक केलं आणि या पात्राच्या कुतुहलामुळे या चित्रपटाकडे मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग वळला.

शिक्षणासाठी कुवत नाही तर ऐपत असावी लागते असे म्हणणाऱ्या फास्टर फेणे या चित्रपटात आजच्या शिक्षण पद्धतीवर खरमरीत भाष्य करण्यात आले आहे. लेखक क्षितिज पटवर्धनने हा फास्टर फेणे खूपच चांगल्या रितीने आणि वेगळ्या पद्धतीने उभा केला आहे.

बन्या म्हणजेच बनेश फेणे (अमेय वाघ) मेडिकलची एन्टरन्स परीक्षा देण्यासाठी पुण्याला येतो. तो भा. रा. भागवत (दिलीप प्रभावळकर) यांच्याकडे परीक्षेच्या दरम्यान राहायला लागतो. बन्या भागवंताच्या घरी ज्या दिवशी येतो, त्याच दिवशी त्यांच्या घरात चोरी झालेली असते बन्या त्याच्या हुशारी आणि चातुर्याने या चोरीची उकल केवळ काही तासातचं करतो. बान्याचा मित्र धनेशने आत्महत्या केली असल्याचे तो पेपरमध्ये वाचतो आणि धनेशने आत्महत्या न करता त्याचा खून झाला आहे याचा बन्याला विश्वास असल्याने तो त्याचा शोध घ्यायचा ठरवतो. यात त्याला त्याची मैत्रीण अबोली (पर्ण पेठे) मदत करतो. पर्ण ही एक पत्रकार असते. या सगळ्यात बन्याचा सामना आप्पा (गिरीश कुलकर्णी) या गुंडासोबत सोबत होतो. बन्या धनेशच्या हत्येची उकल करतो का? बन्याला या सगळ्यात कोण कोणत्या संकटांचा सामना करावा लागतो? हे फास्टर फेणे हा चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

झी मराठीवर फास्टर फेणेचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर येत्या रविवारी म्हणजेच २४ जून रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे. त्यामुळे प्रेक्षक रविवारची संध्याकाळ त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत फास्टर फेणे या चित्रपटाचा आनंद लुटू शकतात.