"Why can't we die with dignity", अंगावर शहारा आणणारा 'आता वेळ झाली' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Aata Vel Zaali Movie Trailer : 'आता वेळ झाली' या चित्रपटाचा भावनिक आणि अंगावर शहारा आणणारा ट्रेलर प्रदर्शित 

दिक्षा पाटील | Updated: Feb 10, 2024, 02:15 PM IST
"Why can't we die with dignity",  अंगावर शहारा आणणारा 'आता वेळ झाली' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित title=
(Photo Credit : PR Handover)

Aata Vel Zaali : इच्छामरण या विषयावर प्रत्येक व्यक्तीची, देशाची, धर्माची, समाजाची वेगवेगळी भूमिका आहे. त्यामुळेच इच्छामरण असावे की नसावे, या विषयावरून आपल्याकडे वर्षानुवर्षे वाद सुरु आहेत. या विषयाचा कधीतरी सोक्षमोक्ष लागेल, या आशेवर जगणारी अनेक माणसं आपल्या आजूबाजूला असतात. अर्थात त्यांची इच्छामरणाची कारणे विभिन्न असतात. जर तुम्हाला तुमचा शेवट आनंदी हवा असेल तर तुम्हाला तुमची कथा कुठे संपवायची, हे माहित असणे आवश्यक आहे, आयुष्यात हे सूत्र जपणाऱ्या एका वयस्क जोडप्याच्या अस्तित्वाची गोष्ट सांगणाऱ्या 'आता वेळ झाली' या चित्रपटाचा भावनिक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. पासष्टी पार केलेल्या शशिधर लेले आणि रंजना लेले यांची इच्छामरणाची परवानगी मिळवण्यासाठीची धडपड यात दिसत आहे. समाजाचा या विषयाप्रती असलेला दृष्टिकोन बदलणारा हा चित्रपट आहे. यात दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी यांच्यासह भारत दाभोळकर, सुरेश विश्वकर्मा, स्मिता तांबे, जयंत वाडकर, अभिनव पाटेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

डेल्ल्लास आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, राजस्थान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, शारजाह फिल्म्स प्लॅटफॉर्म इंटरनॅशनल फेस्टिव्हल अशा अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हजेरी लावणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत नारायण महादेवन यांनी केले असून इमेजीन एंटरटेन्मेंट अँड मीडिया, अनंत नारायण महादेवन फिल्म्स यांच्या सहयोगाने 'आता वेळ झाली' या चित्रपटाचे दिनेश बंसल, जी. के. अग्रवाल आणि अनंत महादेवन निर्माते आहेत. 

हेही वाचा : ट्रोलिंगला कंटाळून अंकिता लोखंडेनं डिलीट केलं इन्स्टाग्राम अकाऊंट! म्हणाली, 'सोशल मीडिया...'

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अनंत महादेवन म्हणतात, '' वयस्क व्यक्तींच्या अस्तित्वाची ही कथा आहे. कोणावरही भार म्हणून न जगता, अंथरुणाला खिळून न राहाता, जीवनाचा शेवट हा आनंदी व्हावा, अशा विचारसरणीच्या जोडप्याची ही कथा आहे. मात्र, हा शेवट आनंदी करण्यासाठी त्यांना दिव्यातून जावे लागते. अखेर हे जोडपे काय निर्णय घेते, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहून मिळणार आहे. आपण सन्मानाने का मरू शकत नाही? हा गहन प्रश्न उपस्थित करणारा 'आता वेळ झाली' हा चित्रपट येत्या २३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रत्येकाने पाहावा असा हा चित्रपट आहे, मात्र तरुणाईने हा चित्रपट आवर्जून पाहावा.''