बंगळुरू : गौरी लंकेश हत्येप्रकरणी शोध घेणाऱ्या विशेष शोध पथकाला (एसआयटी) 'हिट लिस्ट' डायरी सापडली आहे. यामध्ये सिनेमा तसेच रंगमंचावरील प्रसिद्ध गिरीश कर्नाड यांच नावं सर्वात वर असल्याचे पोलिसांनी सांगितले. कर्नाड हे कट्टर हिंदुत्ववाद्यांचे टीकाकार आहेत. गेल्या सप्टेंबरमध्ये लंकेश यांच्या हत्येनंतर कर्नाड यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. डायरीमध्ये सापडलेल्या हिट लिस्टवर गौरी लंकेश यांचे नाव दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांच्या हत्येप्रकरणी पकडलेल्या संशयितांकडुन गेल्या महिन्यात ही डायरी सापडली. एका कट्टरपंथीय समूहाने तयार केलेली सूची सापडली असून यामध्ये ज्यांना टार्गेट करायचं होतं त्यांची नावे असल्याचे एसआयटीने सांगितले. या सूचीत कर्नाड आणि लंकेश यांचे नाव अनुक्रमे एक आणि दुसऱ्या क्रमांकावर होते. ही सूची देवनागरी लिपित होती.
गौरी लंकेश आणि गिरीश कर्नाड यांच्यासहित नेता-साहित्यकार बी टी ललिता नाइक, निदुममिदी मठाचे पुजारी वीरभद्र चन्नामल्ला स्वामी आणि तर्कवादी सी एस द्वारकानाथ यांची नावे आहेत. दक्षिणपंथी हिंदुत्व विचारधारेचे हे कडवे विरोधक आहेत. डायरीत हिटलिस्टवर नाव सापडल्यानंतर गिरीश कर्नाड यांची प्रतिक्रीया विचारली असता, 'मला यामध्ये कोणती रुची नाही, धन्यवाद' अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली.
एसआयटीने गौरी लंकेश हत्येप्रकरणी १० संशयितांना ताब्यात घेतलंय. राजेश डी बंगेरा (५०) ला २३ जुलैला कोडागू जिल्ह्याच्या मादिकेरी येथून उचलण्यात आलं. त्याला मजिस्ट्रेटसमोर आणलं त्यानंतर त्याला ६ ऑगस्टपर्यंत एसआयटीच्या ताब्यात पाठवले. हत्येमध्ये बंगेराच्या भूमिकेबद्दल पोलिसांनी माहिती दिली नसली तरी तो अटक केलेल्या अमोल काळे आणि अमित देगवे यांच्या संपर्कात होता अशी माहिती दिली.