मुंबई : चित्रपटसृष्टीतील अनिश्चितता, यश, ग्लॅमर आणि फेम या सगळ्यामुळे अनेकदा नातेसंबंध टिकवणं कठीण होतं. वैयक्तिक आयुष्यात देखील अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. हा विचार सर्वसामान्यांचाच नाही तर खुद्द दीपिका पदुकोण देखील असाच विचार करते.
दीपिकाच्या अफेर्सच्या चर्चा चांगल्याच रंगतात. रणबीर कपूर नंतर रणवीर सिंग यांच्या सोबतचे तिचे नाते देखील बी टाऊनमध्ये चर्चेचा विषय ठरले. मात्र नातेसंबंधावर भाष्य करताना दीपिका म्हणते, तुम्ही स्टार असाल तर तुमच्या यशाला समजून घेणारा जोडीदार मिळणं अवघड होऊन जातं.
बॉलिवूडमधील या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये दीपिकानेही काही नाती गमावली आहेत. यासंदर्भात ती म्हणते की, "या नऊ वर्षांमध्ये काही मित्रमैत्रिणी माझ्यापासून दुरावले गेले. शाळेतील काही मित्रमैत्रिणी अजूनही संपर्कात आहेत. माझ्या वाट्याला आलेलं यश अनेकांना पाहावलं गेलं नाही आणि ते माझ्यापासून दूर गेले. मला त्याचं दु:ख नाही. प्रेमाच्या नातेसंबंधांचा विचार केला तर तुम्ही जे काही करत आहात ते समजून घेणारा, तुमच्या यशाला हाताळू शकणारा जोडीदार मिळणं कठीण असतं. त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त पैसे कमवत आहात, हे त्याने समजून घेतलं पाहिजे."