डॉक्टर म्हणालेले चालूही शकणार नाही; आज तिच शक्ती आहे सेलिब्रिटी कोरिओग्राफर

तिच्या संघर्षाची कथा तुमच्याही डोळ्यात पाणी आणेल... 

Updated: Oct 12, 2021, 02:28 PM IST
डॉक्टर म्हणालेले चालूही शकणार नाही; आज तिच शक्ती आहे सेलिब्रिटी कोरिओग्राफर title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : रिऍलिटी शोच्या माध्यमातून शक्ती मोहन हा चेहरा सर्वांसमोर आला. पाहता पाहता शक्तीनं आपली वेगळी ओळख या कलाविश्वात प्रस्थापित केली. तिला बालपणापासून नृत्याची विशेष आवड. शिक्षणातही कायम पुढे असल्यामुळे आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न शक्ती उराशी बाळगून होती. पण, नशीबात मात्र काही वेगळंच लिहिलं होतं. ज्यामुळं तिला आयएएस अधिकारी होता आलं नाही.

नृत्य क्षेत्रातच करिअर करण्याचा निर्णय शक्तीने घेतला तेव्हा तिनं या कलेचं रितसर प्रशिक्षण घेतलं. यासाठी 2006 मध्ये ती मुंबईत आली. 2009 मध्ये ‘डान्स इंडिया डान्स’ या रिऍलिटी शोमध्ये शक्ती सहभागी झाली आणि तिनं या कार्यक्रमाचं जेतेपद मिळवलं. पुढे आणखी एका रिअलिटी शोमध्येही ती झळकली.

माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार शक्ती 4 वर्षांची असताना तिच्यासोबत एक मोठी दुर्घटना घडली होती. एका अपघातामध्ये तिचा पाय आणि कंबर या अवयवांना जबर दुखापत झाली होती. अनेक महिने ती रुग्णालयातच होती. ती कधीही चालू शकणार नाही असं तिच्या  आईवडिलांना डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण, आपल्या मुलीच्या आत्मविश्वासावर तिच्या वडिलांचा पूर्ण विश्वास होता. ती चालेल आणि उत्तुंग शिखरं गाठेल याची त्यांना हमी होती. आजच्या घडीला शक्ती त्याच यशाच्या शिखरांवर आहे. जणू काही वडिलांची स्वप्न साकारकरण्यासाठीच ती इथं आली आहे.

सध्या शक्ती एक सेलिब्रिटी नृत्यदिग्दर्शक असून, ती रिऍलिटी शोमध्ये परीक्षक म्हणूनही जबाबदारी बजावत आहे. शक्तीचा संघर्ष आणि परिस्थितीपुढे धीराने उभं राहण्याची ताकदच तिला इथवर घेऊन आली आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.