तुंबाड या चित्रपटाने होणार 'टॉकीज प्रीमियर लीग'ची दमदार सुरुवात

घर बसल्या अनुभवता येणार एक थरार 

Updated: Apr 4, 2020, 03:10 PM IST
तुंबाड या चित्रपटाने होणार 'टॉकीज प्रीमियर लीग'ची दमदार सुरुवात title=

मुंबई : लॉकडाऊन मध्ये प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी झी टॉकीज ५ एप्रिल पासून टॉकीज प्रीमियर लीग सादर करत आहे. यामध्ये प्रेक्षकांना प्रत्येक रविवारी दर्जेदार चित्रपटांचा आस्वाद घेता येईल. टॉकीज प्रीमियर लीगची दमदार सुरुवात ‘तुंबाड’ या भयपटाने होणार असून हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांच्या मनात भीतची लहर उठेल. महाराष्ट्रातील एका छोट्या गावात घडणाऱ्या या चित्रपटाच्या कथेत विनायक राव (सोहम शहा) हा हस्तर या शापित देवतेचे गूढ उकलताना दिसेल. लोककथा, भीती आणि कल्पनारम्यता यांचा सुंदर मिलाफ झालेला हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना काही वेगळाच अनुभव येईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन राहीअनिल बर्वे आणि आदेश प्रसाद यांनी केले असून बर्वे यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. २०१८ मधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानल्या गेलेल्या या चित्रपटाचे प्रसारण रविवारी, ५ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता ‘झी टॉकीज’ वाहिनीवर केले जाईल.

उत्कृष्ट कथानकाला लाभलेल्या उच्च निर्मितीमूल्यांमुळे भारतीय चित्रपटांतील भयपटांना या चित्रपटाने एका वरच्या स्तरावर नेले असून चित्रपटातील भीतीचे प्रसंग पाहताना बरेचदा प्रेक्षकांना आपले हात डोळ्यंवर न्यावेसे वाटतील, इतका त्यात भीतीचा परिणाम साधण्यात आला आहे. 75 व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेला हा पहिला भारतीय चित्रपट ठरला असून भारतीयंसाठी ही निश्चितच एक अभिमानाची बाब म्हणावी लागेल. सोहम शहाशिवाय चित्रपटात ज्योती मालशे, मोहम्मद सामद आणि अनिता दाते हे कलकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये पाहायला मिळतील.

अभिनेता आणि निर्माता सोहम शाह म्हणतात, “तुंबाडने मला शिकवले की जर तुमच्यात स्वप्ने पाहण्याची हिंमत असेल तर काहीच अशक्य नाही. ६ वर्षांचे कठोर परिश्रम, ६ वर्षांचे धैर्य आणि ६ वर्षांची उत्कटता तेव्हा वास्तवात उतरले जेव्हा अखेर तुंबाड मोठ्‌या पडद्यावर रीलीज झाला. मला आजही आठवतंय जेव्हा दिग्दर्शक राही अनिल बर्वे माझ्याकडे या चित्रपटाचं कथानक घेऊन आले तेव्हा ते जे कथानक सादर करतील ते अद्वितीय असेल याची मला खात्री होती आणि आम्हांला हा चित्रपट बनवण्याचा मार्गही शोधायचा होता. ह्या चित्रपटाचे प्रॉडक्शन करणे सोपे नव्हते आणि अभिनयाच्या दृष्टीनेही हे कठीणच होते. मला शारीरिक रूपाने स्वतःला बदलायचे होते आणि माझ्या शैलीवर मेहनत घ्यायची होती. आपल्या कौशल्यावर लक्ष केंद्रित करायचे होते आणि प्रॉडक्शनच्या दैनिक गोष्टीही सांभाळायच्या होत्या. पण आम्हांला मिळालेला अफलातून प्रतिसाद आणि महत्त्वपूर्ण प्रशंसा जी तुंबाडला मिळाली आणि आत्ताही मिळत आहे, त्यामुळे आमच्या कठोर परिश्रमाचे चीज झाले आहे.”

चित्रपटाची कथा १९४७ मध्ये तुंबाड या गावात घडते. छोट्या विनायकाला आपल्या कुटुंबाच्या मालकीच्या प्रचंड धनदौलतीची माहिती मिळते. पण ती प्राप्त करण्याचा प्रयत्न केल्यास त्या संपत्तीचे रक्षण करणाऱ्या सैतानाला बळी पडावे लागेल, अशी ताकीदही त्याला दिली जाते. विनायक आपल्य पणजीची सेवा करीत असे. तिला सदैव बसत्या स्थितीत ठेवणे गरजेचे असते. तिचा मृत्यू झाल्यावर त्याला आपल्या दौलतीचा भाग म्हणून एक घर मिळते. हस्तर नावाचा एक शापित देवता त्यातील संपत्तीचे रक्षण करीत असल्याचे त्याला सांगण्यात येत. अनेक वर्षांनंतर विनायक आपली दौलत प्राप्त करण्यासाठी पुन्हा एकदा तुंबाडला येतो.

अमाप संपत्ती प्राप्त करण्याचे विनायकचे स्वप्न हे भयस्वप्न ठरेल की काय? रविवार, ५ एप्रिल रोजी 'टॉकीज प्रीमियर लीग'मध्ये पाहा ‘तुंबाड’ दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता फक्त आपल्या ‘झी टॉकीज’ वर!