मुंबई : जीवनाच्या प्रवासामध्ये अनेकदा काही अनपेक्षित आणि काही अशी परीक्षा पाहणारी वळणं येतात जेव्हा संयम परिसीमा गाठतो. ही वळणं ओलांडल्यानंतर जे घडतं ते मनाला दिलासा आणि सुख देणारं असतं. ही वळणं असतात संघर्षाची, परिश्रमाची आणि परीक्षेची. अशाच एका वळणावरुन गेलेला अभिनेता म्हणजे सुदेश लहरी.
विनोदी जगतामध्ये नाव घ्यायचं झाल्यास सुदेश लहरीच्या नावाला कायम पसंती मिळते. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा विनोदवीर व्यासपीठावर उभा राहायची खोटी, लगेचच टाळ्यांच्या कडकडाटास सुरुवात होते. पण, प्रेक्षकांचं प्रेम आणि त्यांची साथ मिळण्यापर्यंतचा त्याचा हा प्रवास फारसा सोपा नव्हता.
एक वेळ अशी आली, जेव्हा त्याला जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठीही अपार मेहनत करावी लागली. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. पण, याच पुरस्तार चषकांचं त्याच्या जीवनात मोठं आणि तितकंच महत्त्वाचं स्थान आहे.
आपल्या कुटुंबाची भूक भागवण्यासाठी सुदेशकडे एकेकाळी पैसेही नव्हते. त्यावेळी त्यानं चक्क आपल्याला मिळालेले पुरस्कार 300 ते 400 रुपयांना विकून पैशांची व्यवस्था केली होती. या पैशांतून त्यानं मुलं आणि पत्नीसाठी अन्नधान्याची व्यवस्था केली होती.
शिक्षणाच्या बाबतीत....
कोणत्याही व्यक्तीला त्याच्या शालेय जीवनात मिळालेल्या गुणांवरुन किती यश मिळणार हे ठरवणं खरंच कठीण. कारण, काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तांनुसार सुदेश शाळेतच गेला नाही. पण, आज मात्र तो कुठच्याकुठे पोहोचला आहे.
'द ग्रेट इंडियन' लाफ्टर चॅलेंजपासून करिअरची सुरुवात करणारा सुदेश चहाच्या दुकानात काम करण्यापासून रामलीला आणि लग्नसमारंभांमध्ये गातही असे. पैसे कमवण्यासाठी परिस्थितीनं जे पुढ्यात वाढलं तेच आपलं मानून सुदेश पुढे आला आणि त्यानं आपलं विश्व उभं केलं. यशाची वाट खडतर असते पण, ती तितकीच सुखावहसुद्धा होते यात शंकाच नाही.