पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने (Mahira Khan) घटस्फोटित तसंच सिंगल मदर असण्यामुळे करावा लागणारा संघर्ष, कामात येणारे अडथळे यावर भाष्य केलं आहे. तसंच भारतात पाकिस्तानी कलाकारांवर घालण्यात आलेली बंदी यावरही आपलं म्हणणं मांडलं आहे. यावेळी माहिराने खासकरुन बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) धुम्रपान करतानाचा फोटो व्हायरल झाल्याप्रकरणी मौन सोडलं आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर मला माझं करिअर संपलं असं वाटू लागलं होतं असं तिने सांगितलं आहे.
माहिराने बीबीसी एशियन नेटवर्कशी संवाद साधताना सांगितलं की, "जेव्हा फोटो समोर आले तेव्हा 'द लिटिल व्हाईट ड्रेस' नावाचा एक लेख बीबीसीमध्ये प्रकाशित झाला होता. मी त्या लेखाचं वैशिष्ट्य समजण्यात अयशस्वी झाले होते. मला आठवतं की मी वाचलं आणि विचार कलेा की 'माझं करिअर संपलंय का?".
माहिरा पुढे म्हणाली, "त्या लेखात असं लिहिलं होते की, 'ही एक महिला आहे जिने असं यश मिळवले आहे जे पाकिस्तानमध्ये कोणीही मिळवलेलं नाही. आणि आता ते सर्व संपलं आहे. तिच्यासोबत आता काय होणार आहे? मी ते वाचल्यानंतर फार चिंताग्रस्त झाले होते".
"पण मी स्वतःला म्हणाले, 'तू वेडी आहेस का? हे संपणार आहे. कदाचित ती 14 वर्षांची माहिरा विचार करत होती. पण मी खोटे बोलणार नाही की तो काळ खूप कठीण होता. अंथरुणातून बाहेर पडून मी रोज रडत होते. याचा माझ्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यावर परिणाम झाला,” असं अभिनेत्री म्हणाली.
हा फोटो व्हायरल होताच माहिरा खान आणि रणबीर कपूरच्या नात्याच्या अफवांना उधाण आलं होतं. फोटोमध्ये माहिरा आणि रणबीर न्यूयॉर्कच्या रस्त्यावर धुम्रपान करताना दिसत होते. रणबीर आणि माहिरा पहिल्यांदा दुबईतील ग्लोबल टीचर प्राइज इव्हेंटमध्ये एकत्र दिसले होते. व्हायरल फोटोत धुम्रपान करत असल्याने माहिराला टीकेचा सामना करावा लागला होता आणि तेव्हापासून दोघे एकत्र दिसले नाहीत.
पण माहिराने सकारात्मक राहत पुन्हा एकदा पुनरागम केलं. "मी वैयक्तिकरित्या योग्य गोष्ट केली. मी काही वैयक्तिक निवडी केल्या ज्या माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी योग्य होत्या. व्यावसायिकदृष्ट्या, मी गप्प बसले कारण मला माहित होते की त्या वेळी मी काहीही बोलू शकत नाही. सर्व ब्रँडने मला कॉल केले आणि सांगितले की आम्ही सोबत आहोत," असं तिने सांगितलं.
माहिराने गेल्या वर्षी सलीम करीमशी लग्न केले. माहिरा खानने यापूर्वी अली अस्करीसोबत लग्न केलं होते. 2015 मध्ये ते वेगळे झाले. माहिरा आणि अली यांना 13 वर्षांचा मुलगा आहे. माहिरा पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या नेटफ्लिक्स मालिका 'जो बचे हैं संग समेट लो'मध्ये फवाद खान आणि सनम सईदसोबत दिसणार आहे.