मुंबई : अगदी निवडक, संख्येच्या तुलनेतही कमी चित्रपटांत काम करूनही चित्रपटसृष्टीत आपली वेगळी जागा निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे चित्रांगदा सिंह. पण, सध्या ती, फिल्मी दुनियेतून काहीशी बाहेर आहे. तसेच, ती फार चर्चेतही नसते. करिअरवर इतका दुरगामी परिणाम का झाला याबाबत स्वत: चित्रांगदानेच माहिती दिली आहे.आपण या क्षेत्रात ब्रेक घेतल्यामुळेच करिअरवर परिणाम जाल्याचे चित्रांगदा सांगते. 'हजारो ख्वाहिशे ऐसी'सारख्या चित्रपटातून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरूवात करणाऱ्या चित्रांगदाने अनेक चांगले चित्रपट दिले. ती म्हणते, 'मी जेव्हा करिअरला सुरूवात केली तेव्हा माझ्या आयुष्यात असा काही बदल घडला की, माझ्या प्राथमिकता (प्रायोरिटीज) बदलत गेल्या. मी चित्रपट सृष्टीला अल्पविराम देत चार वर्षांचा ब्रेक घेतला. मी पुन्हा पुनरागमन केल मात्र परत दोन वर्षांसाठी ब्रेक घेतला. या धरसोडीचा करिअरवर प्रचंड परिणाम झाला. हा माझ्या करिअरमधला तोटाच आहे', असेही ती म्हणते.
पुढे बोलताना चित्रांगदा म्हणते, 'चित्रपट सृष्टीत तुम्हाला जेव्हा संधी मिळत असतात पण, अशा वेळी तुम्ही उपलब्ध नसाल तर, त्याची जबर किंमत तुम्हाला मोजावी लागते. माझ्यासोबतही असेच झाले. कदाचित मी चित्रपटसृष्टीतील एक स्टार बनन्यासाठी हवे तेवढे प्रयत्न केले नसावेत.'
चित्रांगताच्या सांगण्यानुसार असे की, काम मिळण्यासाठी तुम्ही फार प्रभावशाली असायला हवे असे नाही. पण, योग्य वेळी तुम्ही उपलब्ध असणे हे अतिशय महत्तवाचे आहे. माझ्याकडे जे चित्रपट निर्माते भूमिका घेऊन आले त्यापैकी अनेक भूमिका या स्त्रिप्रधान होत्या किंवा अत्यंत बौद्धिक क्षमता असलेले. काही काळ असे वाटत होते की, इतर अभिनेत्रींप्रमाणे हलकेफुलके रोल मी करू शकेन की नाही. दरम्यान, सध्या मी माझ्या आयुष्यात सुखी आहे. आनंदी आहे, असेही तिने म्हटले आहे.