...अन् 'श्री'च्या आठवणीने गहिवरले बोनी कपूर

आज त्या इथे असत्या तर..... 

Updated: Nov 19, 2019, 01:04 PM IST
...अन् 'श्री'च्या आठवणीने गहिवरले बोनी कपूर title=
छाया सौजन्य- ट्विटर

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांची एक्झिट सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली. 'मिस हवाहवाई' या नावाने श्रीदेवी ओळखल्या जातात. पण, त्यापलीकडेही मुळात त्यापूर्वीही त्यांनी आपलं अस्तित्व या कलाविश्वात प्रस्थापित केलं होतं. अशा या अभिनेत्रीला जेव्हा कलाविश्वातील योगदानासाठी गौरवण्यात आलं, तेव्हा पती बोनी कपूर यांना पुन्हा एकदा भावनांना आवर घालता आला नाही. 

काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या एएनआर पुरस्कार म्हणजेच अक्किनेनी नागेश्वर राव अवॉर्ड सोहळ्यामध्ये बॉलिवूड निर्माते- दिग्दर्शक बोनी कपूर यांना गहिवरून आलं. सोशल मीडियावर या पुरस्कार सोहळ्यातील काही फोटो व्हायरल झाले. ज्या फोटोंमध्ये पुरस्कार स्वीकारतेवेळी दाटून आलेल्या भावना कपूर यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे पाहायला मिळाल्या. 

श्रीदेवी यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारताना बोनी कपूर यांनी त्यांच्या वतीने आभार व्यक्त केले. 'आज त्या (श्रीदेवी) इथे असत्या, तर त्यांना पुरस्कार स्वीकारते वेळी फार आनंद झाला असता. मी त्यांच्या वतीने विनम्रतेने हा पुरस्कार स्वीकारतो', अशा मोजक्या शब्दांत त्यांनी आभार व्यक्त केले. त्यावेळीही दाटून आलेल्या भावनांमुळे जड झालेला त्यांचा आवाज सर्वकाही सांगून गेला. 

श्रीदेवी यांच्या आठवणीने भावूक होण्याची बोनी कपूर यांची ही पहिली वेळ नाही. त्यांच्या निधनाला बरेच दिवस उलटूनही आपल्या कुटुंबातील एक महत्त्वाची व्यक्ती, आपली सहचारिणी, आपल्या मुलींची आई दूर गेल्याचं दु:ख आणि एक पोकळी कायमच त्यांच्या जीवनात पाहायला मिळते. अनेकदा याच भावनांना ते अश्रू आणि शब्दांद्वारे वाट मोकळी करुन देतात. 

दरम्यान, #ANRawards या पुरस्कार सोहळ्याच्या वेळी इतरही काही सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळाली. यामध्ये अभिनेता नागार्जुन यांचं कुटुंब, अभिनेता चिरंजीवी आणि चिरतारुण्यवती अभिनेत्री रेखा यांनी हजेरी लावली होती.