मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (salman khan) यानं अगदी पहिल्या चित्रपटापासून त्याच्या कारकिर्दीतून सर्वांचं लक्ष वेधलं. 'सलमान भाई' या नावानं अनेकांनीच भाईजानवर नितांत प्रेम केलं. अनेकांना बॉलिवूडमध्ये नवी ओळख देण्यासही सलमानच कारणीभूत होता.
1988 पासून सलमाननं बॉलिवूजमध्ये पदार्पण केलं आणि भक्कम असा चाहता वर्ग निर्माण केला.
सलमाननं चित्रपटांपासून कारकिर्दीची सुरुवात केली, असं तुम्हाला वाटत असेल तर तसं नाहीये. कारण, त्यानं यापूर्वीच कॅमेरासमोर येण्याचा अनुभव घेतला होता.
कॅम्पा कोलाच्या जाहिरातीतून सलमान झळकला होता. ज्याचं दिग्दर्शन कैलाश सुरेंद्रनाथ यांनी केलं होतं.
दिग्दर्शकाच्या गर्लफ्रेंडमुळं सलमानला ही जाहिरात मिळाली होती. यामागची कहाणी तशी रंजक.
एका कार्यक्रमात सलमाननं याबाबतचा खुलासा केला होता. 'मी एकदा स्विमींग पूलमध्ये पोहत होतो. सी रॉक क्लबमध्ये... तेव्हाच मी एका सुंदर महिलेला तेथून चालताना पाहिलं.
लाल रंगाची साडी तिनं नेसलेली होती. तिच्यावर प्रभाव पाडण्यासाठी म्हणून मी पाण्यात उडी मारली.
बरं मी इतरा वेंधळा की, संपूर्ण स्विमींग पूल मी पाण्याच्या आतूनच पोहत पार केला. जेव्हा बाहेर आलो तेव्हा पाहतो तर काय, ती तिथं नव्हती.'
सलमान काहीसा हिरमुसला. पण, दुसऱ्याच दिवशी कोल्डड्रींकच्या जाहिरातीसाठी म्हणून त्याला फोन आला.
कॅम्पा कोलाची ती जाहिरात होती. पण, ही जाहिरात आपल्याला कशी मिळाली, याचाच विचार सलमान करत होता.
तो त्याच्या काकांसोबत कैलाश सुरेंद्रनाथ यांना भेटण्यासाठी गेला. तिथे सर्व चर्चा झाल्यानंतर तुम्हाला माझा फोन नंबर कोणी दिला, असा प्रश्न सलमानने केला.
ज्यावर कैलाश यांनी उत्तर देत, तु जिच्यावर भुरळ पाडण्याचा प्रयत्न करत होतास, ती माझी गर्लफ्रेंड. तिनंच मला सांगितलं की तू छान पोहतोस, असं ते म्हणाले.
पुढे काय, पाण्यातून पोहण्याच्या याच कलेमुळं सलमानला ती जाहिरात मिळाली आणि त्यानं पहिल्यांदाच कॅमेरासमोर येत आपली जादू दाखवली.