तिघांची हत्या करुन 'कबीर सिंग'च्या चाहत्याची आत्महत्या

चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणतो... 

Updated: Oct 16, 2019, 09:11 PM IST
तिघांची हत्या करुन 'कबीर सिंग'च्या चाहत्याची आत्महत्या title=

मुंबई : शाहिद कपूरची मुख्य भूमिका असणाऱ्या 'कबीर सिंग' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. कोट्यवधींच्या घरात कमाई करणाऱ्या या चित्रपटाचे आकडे अनेकांना थक्क करुन गेले. तर, एक अभिनेता म्हणून शाहिदच्या कारकिर्दीला याच चित्रपटाने कलाटणी दिली. टीकेची झोड उठलेली असताना काही प्रेक्षकांनी मात्र काहीशा हिंसक, प्रेमात आकंठ बुडालेल्या, वाईट सवयींच्या वाटेवर जाऊन आलेल्या 'कबीर सिंग'ला स्वीकारलं. 

आता पुन्हा एकदा 'कबीर सिंग' चर्चेत आला आहे. पण, यावेळी या चर्चा होत आहेत त्या म्हणजे एका माथेफिरु चाहत्यामुळे. ज्याने तिघांची हत्या करुन त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केल्याचं कळत आहे. 

'हिंदुस्तान टाईम्स'मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार अश्वनी कश्यप असं त्या कथित चाहत्याचं नाव आहे. तो जॉनी दादा म्हणूनही ओळखला जात होता. त्याने हत्या केलेल्या तिघांमध्ये एका हवाई सुंदरीचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. 

'टीक- टॉक व्हिलन' म्हणूनही तो ओळखला जात होता ते म्हणजे तो पोस्ट करत असणाऱ्या उग्र, रागीट व्हिडिओंमुळे.  मुख्य म्हणजे तो शाहिद कपूर याची मुख्य भूमिका असणाऱ्या 'कबीर सिंग' या चित्रपटाचा चाहताही होता. या चित्रपटातील काही फोटो तो वारंवार सोशल मीडियावर पोस्ट करत असे. 'जो मेरा नही हो सकता, उसे किसी और के होने का मौका नही दूँगा', असा चित्रपटातील डायलॉगही त्याने एकदा पोस्ट केला होता. 

काय आहे प्रकरण? 

उत्तर प्रदेशातील स्थानिक भाजपा नेते भीम सेन यांच्या दोन नातेवाईची आणि निकीता शर्मा या हवाई सुंदरीची हत्या करणाऱ्या कश्यपला पोलीस पडकणार इतक्यातच त्याने स्वत:वरही गोळी झाडून घेतली होती. 

कश्यपचं हे कृत्य आणि त्याचं चित्रपटाशी नाव जोडलं जाण्याच्या प्रकरणीच्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच अखेर संदीप रेड्डी वंगा म्हणजेच चित्रटाच्या दिग्दर्शकाने त्याची भूमिका स्पष्ट केली. माध्यमांशी संवाद साधताना, आपण कोणीच या अशा कृत्यांचं समर्थन करत नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. अनेक मानसिक रुग्ण हे त्यांच्या समस्यांशी मिळतीजुळती उदाहरणं शोधत असतात. मुळात कबीर सिंग याने स्वत:च्या हाताने स्वत:ची ती अवस्था करुन घेतली होती, ही बाब त्याने थेट शब्दांत अधोरेखित केली.