India`s Most Wanted : 'त्या' दहशतवाद्याला शोधण्यासाठी अर्जुनचा पुढाकार

एका निनावी दहशतवद्याच्या शोधात...

Updated: Apr 16, 2019, 06:33 PM IST
India`s Most Wanted : 'त्या' दहशतवाद्याला शोधण्यासाठी अर्जुनचा पुढाकार  title=

मुंबई : बऱ्याच काळानंतर अभिनेता अर्जुन कपूर याचा अतिशय प्रभावी अभिनय असणारा 'इंडियाज मोस्ट वॉण्टेड' या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. खुद्द अर्जुननेच हा ट्रेलर सर्वांच्या भेटीला आणत त्याच्या आगामी चित्रपटाची माहिती दिली. वाढता दहशतवाद आणि त्या दहशतवादाला लढा देण्यासाठी पुढे आलेला एक तरुण यांच्याभोवती चित्रपटाचं कथानक फिरणार असल्याची चिन्हं या व्हिडिओतून पाहायला मिळतात. 

मध्यवर्ती भूमिकेत असणाऱ्या अर्जुनचा 'इंडियाज मोस्ट वॉण्टेड'मधील अंदाज हा बऱ्याच अंशी प्रभावी ठरत आहे. त्याच्या अभिनयाचाही एक वेगळा पैलू टीझरमधून पाहायला मिळत आहे. एका निनावी दहशतवद्याच्या शोधात निघालेला तरूण अर्जुन साकारत आहे. हा तरुण खास आहे, कारण तो कोणत्याही प्रकारच्या लष्करी मदतीशिवाय या अशक्य मोहिमेला शक्य करुन दाखवण्याचा ध्यास बाळगत आहे. 

अर्जुनने चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करत त्याविषयी एक लक्षवेधी कॅप्शनही लिहिलं. मुख्य म्हणजे त्याच्या कॅप्शनशिवाय चित्रपटातील एक संवाद आतापासूनच प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. 'आत्मा कधीच मरत नाही; मरतं ते शरीर. मी लोकांना मारत नाही, मी फक्त त्यांना एका वेगळ्या शरीरात पोहोचवतो. हे मी नव्हे, तर पवित्र गीतेमध्ये खुद्द भगवान कृष्णच म्हणाले होते', हाच तो संवाद. 

राजकुमार गुप्ता दिग्दर्शित या चित्रपटातील संवाद आणि त्याचा टीझर पाहता आता अर्जुनची ही मोहिम प्रेक्षकाची मनं जिंकणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. २४ मे २०१९ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे अर्जुनची ही शोधमोहिम बी- टाऊनमध्ये गाजणार का, याकडे चित्रपटाच्या संपूर्ण टीमचंही लक्ष लागलं आहे.