मुंबई : चित्रपट जगतात काही आव्हानात्मक आणि तितक्याच रंजक कथानकांना हाताळत दर्जेदार कलाकृती सादर करणाऱ्या आणि दिग्दर्शन क्षेत्रात आपली वेगळी छाप सोडणाऱ्या निशिकांत कामत यांचं वयाच्या ५० व्या वर्षी निधन झालं. अभिनेता रितेश देशमुख यांनी ट्विटकरून ही माहिती दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीत बिघाड झाल्यामुळं त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांना काही काळापूर्वी Liver Cirrhosisचा त्रास होता. ज्यानंतर पुन्हा एकदा त्यांना हा त्रास सतावू लागला होता.
I will miss you my friend. #NishikantKamat Rest In Peace. pic.twitter.com/cqEeLbKJPM
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 17, 2020
'दृश्यम', 'मदारी', 'मुंबई मेरी जान' यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटातून निशिकांत कामत यांनी आपला ठसा बॉलिवूडमध्ये उमटवला. त्याआधी 'डोंबिवली फास्ट' या चित्रपटाचं दिग्दर्शन केल्यानंतर निशिकांत कामत हे नाव साऱ्या महाराष्ट्राला परिचयाचं झालं होतं.
दिग्दर्शक केदार शिंदे यांनी देखील ट्विट करून निशिकांत कामत यांच्या निधनाची माहिती दिली आहे.
निशीकांत कामत....
— Kedar Shinde (@mekedarshinde) August 17, 2020
'डोंबिवली फास्ट'च्या माध्यमातून राष्ट्रीय पुरस्कारालाही कामत यांनी गवसणी घातली. पुढं जॉन अब्राहमच्या 'रॉकी हँडसम' चित्रपटात ते खलनायकी भूमिकेत दिसले होते. त्यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या 'लय भारी' या चित्रपटालाही प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली होती. 'सातच्या आत घरात', या चित्रपटातून त्यांनी साकारलेला 'अनिकेत' बराच गाजला होता. २०२२ साली त्यांचा 'दरबदर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणं अपेक्षित होतं.