विकी कौशल बॉलिवूडमध्ये आणतोय नवं 'भूत'

थरकाप उडणारच.... 

Updated: Jun 10, 2019, 11:22 AM IST
विकी कौशल बॉलिवूडमध्ये आणतोय नवं 'भूत' title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये आघाडीच्या कलाकारांना टक्कर देणाऱ्या अभिनेता विकी कौशल याच्या आगामी चित्रपटांकडे अनेकांच्या नजरा आहेत. 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटातून अभिनयाची दमदार झलक दाखवणाऱ्या विकीकडून प्रेक्षकांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. अर्थात एक अभिनेता म्हणून त्याच्यासाठी ही महत्त्वाची आणि तितकीच मोठी बाब आहे. असा हा लोकप्रिय अभिनेता येत्या काळात एका भयपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून याविषयी माहिती देत खुद्द विकीनेच त्याच्या या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.'वास्तवाहून आणखी भयावह दुसरं काहीच नाही...', असं कॅप्शन त्याने या फोटोला देत या भीतीदायक विश्वाची ओळख करुन दिली.  

सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोमध्ये चित्रपटाच्या नावाप्रमाणेच काही दृश्य पाहायला मिळत आहेत. 'भूत- पार्टवन: द हंटेड शीप', BHOOT — Part One: The Haunted Ship असं नाव असणाऱ्या या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये विकीचा लूक पाहता भीती म्हणजे नेमकं काय, याची झलक पाहायला मिळते. यामध्ये विकी एका खिडकीतून मदतीच्या आशेने आणि एक प्रकारच्या भीतीमुळे आकांताने आरोळी ठोकत असल्याचं दिसत आहे. तर, त्याचा चेहरा कोणा एका महिलेने पकडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे एकंदर पोस्टर पाहता चित्रपटाच्या कथानकाविषयी कुतूहल निर्माण झालं आहे. 

निर्माता- दिग्दर्शक करण जोहर या चित्रपटाच्या निमित्ताने नेहमीच्या रोमॅन्टीक कथानकांपासून दूर येत एका भयपटाची निर्मिती करत आहे. भानुप्रताप सिंह दिग्दर्शित या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतच पूर्ण झालं. नोव्हेंबर महिन्याच्या १५ तारखेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.