बंगळुरू : ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांचं सोमवारी सकाळी बंगळुरू येथील त्यांंच्या राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. गिरीश कर्नाड यांच्या निधनामुळे कलाविश्वाचा आधारस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
Girish Karnad, veteran actor and playwright, and Jnanpith awardee, passed away this morning. More details awaited pic.twitter.com/YiQT8kCEqD
— ANI (@ANI) June 10, 2019
१९ मे १९३८ रोजी महाराष्ट्रातील माथेरान येथे गिरीश कर्नाड यांचा जन्म झाला होता. कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील ‘कार्नाड’ हे त्यांचं मूळ गाव. पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये त्यांचं शालेय शिक्षण पार पडलं. तर, महाविद्यालयीन शिक्षण धारवाडच्या कर्नाटक कॉलेजात झालं. गणित आणि संख्याशास्त्र हे विषय घेऊन त्यांनी विद्यापीठात अव्वल क्रमांक पटकवला होता. पुढे प्रतिष्ठित अशी ऱ्होडस शिष्यवृत्ती मिळवून ऑक्स्फर्ड विद्यापीठात तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांत १९६३ मध्ये त्यांनी एम.ए. केले. त्यानंतर तिथेच ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी प्रेसमध्ये काही काळ काम केल्यावर त्यांच्या मद्रास येथील कचेरीत ते काम करू लागले होते.
भारतीय कलाविश्वात अतिशय महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्यांमध्ये कर्नाड यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला जातो. काळानुरूप बदलत्या कलाविश्वात पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते म्हणून गिरीश कर्नाड अनेकांच्या आदर्शस्थानी होते. नाटककार, अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक अशा प्रत्येक भूमिकेला त्यांनी कायम समर्पितपणे न्याय दिला.
साहित्य आणि कला क्षेत्रातील गाढे अभ्यासक म्हणून ते नेहमीच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले. या अद्वितीय कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं होतं. ज्यामध्ये पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारांसह मानाच्या अशा ज्ञानपीठ पुरस्काराचाही समावेश आहे. भारतीय साहित्यातील योगदानासाठी १९९८ या वर्षी पहिल्यांदाच एखाद्या नाटककाराला या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. अपार पुस्तकप्रेम, अफाट वाचन, चिंतन, प्रयोगशीलता ही त्यांच्या व्यक्तीमत्वाची खास वैशिष्ट्ये.
कर्नाड यांनी ‘कानुरू हेगाडीथी’ (१९९९) या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. तर ‘इक्बाल’ (२००५) आणि ‘लाइफ गोज ऑन’ (२००९) यासोबतच 'टायगर जिंदा है' या चित्रपटांतून ते झळकले होते. त्यांना चार फिल्मफेअर पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं होतं. ज्यापैकी तीन पुरस्कार कन्नड चित्रपट 'वंश वृक्ष' (१९७२), 'काडू' (१९७४), 'ओन्दानुंडू कालाडल्ली' (१९७८) या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी आणि ‘गोधुली’ (१९८०) या चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी मिळाला होता.