निशिकांत कामत यांच्या निधनाने कलाविश्व हळहळले

निशिकांत कामत यांना जुलै महिन्यात हैदराबादच्या एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

Updated: Aug 17, 2020, 05:41 PM IST
निशिकांत कामत यांच्या निधनाने कलाविश्व हळहळले title=

मुंबई: प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे सोमवारी प्रदीर्घ आजाराने हैदराबादमधील रुग्णालयात निधन झाले. ते ५० वर्षांचे होते. निशिकांत कामत बऱ्याच काळापासून Liver Cirrhosisची व्याधीने त्रस्त होते. गेल्या काही दिवसांत हा आजार बळावला होता. त्यामुळे निशिकांत कामत यांना जुलै महिन्यात हैदराबादच्या एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तेव्हापासून निशिकांत कामत यांची प्रकृती सातत्याने खालावत होती. अखेर आज सकाळी निशिकांत यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर निशिकांत कामत यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा देत आहेत. 

झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' कार्य़क्रमाचे सूत्रधार निलेश साबळे यांनी निशिकांत कामत यांच्या निधनाविषयी दु:ख व्यक्त केले. 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात येणारा निशिकांत कामत हा पहिला दिग्दर्शक होता. त्यांनी 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम मराठी चित्रपटसृष्टीसाठी कशाप्रकारे महत्त्वाचा आहे, हे इतरांना पटवून दिले. तसेच वेळोवेळी त्यांनी आम्हाला प्रोत्साहनही दिल्याचे निलेश साबळे यांनी सांगितले.