अखेर 'फँटम' बंद

.... आणि आम्ही अपयशीही झालो

Updated: Oct 7, 2018, 09:13 AM IST
अखेर 'फँटम' बंद  title=

मुंबई: एखाद्या चित्रपटाच्या यशाचं गणित हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतं. मग ते दिग्दर्शन असो,. कथानक असो, कलाकारांचा अभिनय असो किंवा इतरही काही गोष्टी असो. एखादा चित्रपट हा त्याच्या निर्मिती संस्थेमुळेही तितकाच चर्चेत येतो आणि बॉक्स ऑफिसवर आपली जादू करतो. म्हणजे अनेकदा ती निर्मिती संस्थाच चित्रपटाच्या यशाची गणितं ठरवून मोकळी झालेली असते. सध्याच्या घडीला अशाच निर्मिती संस्थांच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे 'फँटम'. 

'फ सेssss फँटम' असा आवाज आणि तशी पाटी चित्रपट सुरु होण्यापूर्वी पाहायला मिळाली की पडद्यावर काहीतरी अफलातून कलाकृती पाहता येणार हे कळून जातं. पण, यापुढे मात्र हा आवाज आणि ती पाटी पुन्हा प्रेक्षकांना पाहता येणार नाही आहे. 

अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने, विकास बहल आणि मधू मंटेना यांनी मिळून सुरु केलल्या फँटम फिल्म्स या निर्मिती संस्थेला आता टाळं लागलं आहे. खुद्द अनुराग कश्यपनेच त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन याविषयीची माहिती दिली. 

'फँटम' एक स्वप्न होतं. एक महत्त्वाकांक्षी स्वप्न आणि सगळीच स्वप्न एक दिवशी संपुष्टात येतात. आम्ही सर्तोत्तम कामगिरी केली, यश संपादन केलं आणि अपयशीही झालो. मला आशा आहे की यापुढे या परिस्थितीतूनही वर येऊ आणि आपापली स्वप्न एकट्यानेच साकार करू. आमच्या शुभेच्छा एकमेकांसोबत असतीलच, असं त्याने या ट्विटमध्ये लिहिलं. 

विक्रमादित्य मोटवाने यानेही ट्विट करत 'फँटम'च्या निमित्ताने असणारी भागीदारी आता संपुष्टात असल्याचं म्हणत ही आपल्या आयुष्यातील एक अविस्मरणीय गोष्ट आहे, असं म्हटलं आहे. दरम्यान आता ही निर्मिती संस्था नेमकी बंद का करण्यात आली असाच प्रश्न सर्वांच्या मनात घर करत आहे. 

दिग्दर्शक विकास बहलने एका महिलेसोबत असभ्य वर्तन केल्याच्या मुद्दयावरुन या चारही जणांमध्ये काही मतभेद झाले परिमामी हा मोठा निर्णय घेण्यात आला,  असंही म्हटलं जात आहे. 

'गँग्स ऑफ वासेपूर', 'लुटेरा', 'क्वीन', 'ट्रॅप्ड' अशा अफलातून चित्रपटांची निर्मिती फँटम अंतर्गत करण्यात आली होती. त्याशिवाय लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या 'सेक्रेड गेम्स' य़ा वेब सीरिजच्या निर्मितीतही फँटमला मोलाचा वाटा होता.