मधुबालामागोमाग आता श्रीदेवींप्रमाणे दिसणारी TikTok स्टार व्हायरल

ही तरुणी साऱ्यांचं लक्ष वेधून गेली.   

Updated: Nov 20, 2019, 01:05 PM IST
मधुबालामागोमाग आता श्रीदेवींप्रमाणे दिसणारी TikTok स्टार व्हायरल title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सोशल मीडियावर काही गोष्टी अशा काही प्रकाशझोतात येतात की विचारुन सोय नाही. अशामध्येच गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे ती म्हणजे, TikTok या ऍपची. अवघ्या काही दिवसांतच भलतीच प्रसिद्धि मिळालेल्या या ऍपवर दिवंगत अभिनेत्री आणि आरस्पानी सौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मधुबाला यांच्याप्रमाणे हुबेहूब दिसणारी एक तरुणी साऱ्यांचं लक्ष वेधून गेली. 

मधुबाला यांच्याप्रमाणे दिसणारी, हसणारी प्रियांका कंडवाल हिच्या चर्चांना पूर्णविराम मिळत नाही, तोच आता हिंदी कलाविश्वातील 'मिस हवाहवाई' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांच्याप्रमाणेच जवळपास मिळतीजुळती चेहरेपट्टी असणारी राखी नामक एक तरुणी अनेकांचं लक्ष वेधत आहे. 

राखीने TikTokवर पोस्ट केलेल्या काही व्हिडिओंमध्ये ती श्रीदेवी यांचे काही डायलॉग्स आणि त्यांच्या गाण्यांवर हावभाव करताना दिसत आहे. तिच्या एकंदर अदा आणि अंदाज पाहता श्रीदेवी यांची आठवण झाल्यावाचून राहत नाही. तिचे व्हिडिओ पाहून अनेकांनाच श्रीदेवी आणि तिच्या चेहऱ्यात साम्य आढळल्यामुळे तिचे व्हिडिओसुद्धा अनेकांनी शेअर केले आहेत. 

अरेच्चा! ही तर हुबेहूब मधुबाला....

मुख्य म्हणजे TikTokच्या माध्यमातून फक्त मधुबाला आणि श्रीदेवीच नव्हे, तर दीपिका पदुकोण, सलमान खान, करिना कपूर खान यांच्याही काही हौशी चाहत्यांनी या सेलिब्रिटींच्या अंदाजात काही धमाल व्हिडिओ पोस्ट केल्याचं पाहायला मिळालं होतं. ज्यामध्ये हे नेटकरी या कलाकारांशी फार प्रमाणात मिळतेजुळतेही दिसत होते. त्यामुळे TikTokच्या निमित्ताने कलाकारांप्रमाणेच दिसणारे काही सर्वसामान्य चेहरेही प्रसिद्धीझोतात आहे असं म्हणायला हरकत नाही.