चित्रपटाच्या सेटवर कतरिनावर केर काढण्याची वेळ

पाहा हा व्हिडिओ 

Updated: Feb 6, 2020, 07:11 PM IST
चित्रपटाच्या सेटवर कतरिनावर केर काढण्याची वेळ  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : चित्रपटाच्या सेटवर सहसा चित्रीकरणासोबतच कलाकार मंडळींची धमालही सुरु असते. अनेकदा काही सेलिब्रिटी सेटवरील हा माहोल सर्वांपर्यंत आणतात. सध्या असाच माहोल सर्वांसमोर आणला आहे, तो अभिनेता अक्षय कुमार याने. 'स्वच्छ भारत अभियानाची नवी सदिच्छादूत', असं कॅप्शन देत त्याने कतरिना कैफचा एक धमाल व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

अक्षयने पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये कतरिना सफेद रंगाच्या लखनवी कुर्त्यामध्ये दिसत आहे. तिच्या हातात एक केरसुणी दिसत असून सेटवरील केर काढतानाचं कतरिनाचं हे रुप अक्षयने सर्वांच्या भेटीला आणलं आहे. कतरिना हे तू काय करत आहेस....? असं अक्षय कतरिनाला विचारतो, त्यावर ती त्याला उत्तर देत आपण साफसफाई करत असल्याचंही स्पष्ट करते. 

अक्षय आपली खिल्ली उडवत असल्याचं लक्षात येताच कतरिना, त्याला मस्करीमध्ये त्याच केरसुणीने मारुही लागते. खिलाडी कुमार आणि कतरिनाची ही भलतीच जुगलबंदी सोशल मीडियावर कमालीची गाजत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तर, कित्येकांनी त्यावर कमेंटही केल्या आहेत. 

अक्षय आणि कतरिना गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र होते, त्यादरम्यानचाच हा व्हिडिओ. 'सूर्यवंशी' असं त्यांच्या या चित्रपटाचं नाव आहे. २७ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांच्याव्यतिरिक्त जॅकी श्रॉफ, गुलशन ग्रोवर, सिकंदर खेर हे कलाकार झळकणार आहेत.