मुंबई : मुंबईबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आणि मुंबई पोलिसांबद्दलही चुकीचं वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौत हिला होणारा विरोध सातत्यानं वाढत असचानाच तिच्या अडचणींमध्ये आता वाढ होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. एकिकडे केंद्र सरकारकडून 'Y' दर्जाची सुरक्षा देण्यात आलेल्या कंगनाला दुसरीकडे मात्र भलत्याच अडचणींचा सामान करावा लागत आहे. कारण, कंगनाच्या मुंबईतील पाली हिल येथील कार्यालयावर सोमवारी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अचानक धाड टाकण्यात आली.
कार्यालयात अनधिकृत बांधकाम झाले आहे का, याची पाहणी करण्यासाठी ही धाड टाकण्यात आल्याचं म्हटलं गेलं. ज्यानंतर समोर आलेली माहिती पाहता कार्यालयाची उभारणी करतेवेळी काही नियमांचं उल्लंघन केलं गेल्याचं म्हटलं जात आहे.
सदर बांधकामात निवासी वापर क्षेत्राचं रूपांतर व्यावसायिक वापर क्षेत्रात केल्याचं पाहणीत उघड झाल्याची सुत्रांची माहिती आहे. नियमांचे उल्लंघन झाल्याची माहिती महापालिकेकडं प्राप्त झाल्यानं बीएमसीच्या एच पश्चिम विभागाच्या अधिका-यांकडून कंगनाच्या ऑफिसची तपासणी करत कोणकोणत्या नियमांचे उल्लंघन झालेले आहे, याबाबतीतला संपूर्ण अहवाल दोन दिवसांत तयार केला जाणार आहे.
वापरातील बदल (चेंज ऑफ यूझ) झाल्यानं मालमत्ता कर आकारणीच्या मूल्यमापनातही फरक पडतो. त्यामुळं ही बाजूही तपासण्याचं काम सुरू असल्याचं कळत आहे. १९७९ च्या प्लॅननुसार हा बंगला निवासी वापरासाठी असल्याची माहिती आहे.
सप्टेंबर २०१७ मध्ये कंगणानं ही जागा २०.७ कोटी रूपयांना खरेदी केली होती. ३०७५ चौरस फूट इतका याचा बिल्टअप एरिया आहे. या भूखंडाची सोमवारी सकाळी एच पश्चिम विभागाच्या टिमनं पाहणी केल्यानंतर सायंकाळी इमारत प्रस्ताव विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी कंगनाच्या कार्यालयाला भेट देत तपासणी केली. आता या दोन्ही टिम एकत्रित बसून अहवाल तयार करत असल्याचं कळत आहे. तसंच कंगनाच्या ऑफिसबरोबरच या लेनमधील आणखी काही बंगले, ऑफिसेस यांचीही तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळं आता या प्रकरणाला पुढं कोणतं वळण मिळणार हे अहवालानंतरच कळेल हे स्पष्ट होत आहे.