सलमानची चापलूसी करण्यात करण जोहरची आघाडी, कंगनाच्या बहिणीचं टीकास्त्र

'भारत'ची प्रशंसा करणाऱ्यांवर कंगनाच्या बहिणीची आगपाखड

Updated: Jun 6, 2019, 11:14 AM IST
सलमानची चापलूसी करण्यात करण जोहरची आघाडी, कंगनाच्या बहिणीचं टीकास्त्र  title=

मुंबई : रमजान ईदच्या निमित्ताने अभिनेता सलमान खान याची मुख्य भूमिका असणारा 'भारत' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. कतरिना कैफ, सुनील ग्रोव्हर, जॅकी श्रॉफ यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच रसिकांमध्ये असणाऱ्या उत्सुकता शिगेला पोहोचली होती. ज्याचे पडसाद चित्रपटाला मिळणाऱ्या एकूण प्रतिसादात पाहायला मिळाले. 

सलमानच्या या चित्रपटाच्या कमाईने पहिल्य दिवशी जवळपास ३० कोटींचा आकडा गाठला. भाईजानच्या चाहत्यांवर या चित्रपटाची चांगलीच छाप पाहायला मिळत आहे. फक्त चाहतेच नव्हे तर बॉलिवूड सेलिब्रिटींनीही 'भारत'ची प्रशंसा केली आहे. पण, या बी- टाऊन सेलिब्रिटींचा अंदाज मात्र अभिनेत्री कंगना रानौतची बहीण रंगोली हिला काही रुचलेला नाही. कारण, चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता लगेचच तिने एक ट्विट करत या माध्यमातून बॉलिवूड सेलिब्रिटींवर निशाणा साधला. हे सेलिब्रिटी सलमानचे चापलूस असल्याचं म्हटलं. 

निर्माता- दिग्दर्शक करण जोहरचा स्पष्ट उल्लेख करत तो या चित्रपटाची प्रशंसा करणाऱ्या, सलमानची चापलूसी करणाऱ्यांचं प्रतिनिधीत्व करण्यात आघाडीवर असल्याचं ती या ट्विटमध्ये म्हणाली आहे. उपरोधिक स्वरात ट्विट करत, 'तुम्ही ही चापलूसी कशी करता, हे आम्हालाही शिकवा. एखाद्याच्या पाठीमागे (अनुपस्थितीत) त्यांच्यावर टीका करणं त्यांच्या समोर मात्र चापलूसी करणं हे जमतं तरी कसं......?', असा प्रश्न तिने या ट्विटमधून उपस्थित केला. 

गेल्या काही दिवसांपासून रंगोलीचं नाव चांगलच प्रकाशझोतात आलं आहे. कंगना रानौतचे बऱ्याच सेलिब्रिटींसोबतचे वाद मिटत नाहीत तोच रंगोलीनीही सेलिब्रिटींवर बोचऱ्या शब्दांमध्ये टीका केल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये सक्रीय नसूनही या वर्तुळात रंगोली या- न- त्या कारणाने चर्चेत आहे हे मात्र नाकारता येणार नाही.