मुंबई : कलाविश्वातील प्रस्थापितांच्या विरोधात निर्धास्तपणे आवाज उठवणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौत हिनं काही दिवसांपूर्वीच या झगमगणाऱ्या विश्वाचा आणखी एक चेहरा सर्वांपुढं आणला. एका मोठ्या कलाकारानं त्याच्या ड्रग्ज ओव्हरडोसबद्दल गौप्यस्फोट करणाबद्दल आपल्याला धमकावल्याचा दावा कंगनानं केला.
'रिपब्लिक टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत तिनं हा खुलासा केला. अमुक एका कलाकाराच्या चित्रपटाच्या सेटवर आपल्याला ड्रग्ज देण्यात आल्याचाही खुलासा तिनं केला होता.
लास वेगसमधील प्रसंगाबाबत सांगत कंगना म्हणाली, 'त्यावेळी त्याची परदेशी प्रेयसी त्याच्यासोबतच असायची. दररोज रात्री तिथं पार्टी व्हायची. ड्रग्ज तर पाण्यासारखे वाहायचे. एलएसडी, कोकेन, ecstasy pills अशा प्रकारचे अंमली पदार्थ ते दिवसाही घ्यायचे'. इतकंच नव्हे तर, नाव न घेता ज्या अभिनेत्याबाबत तिनं हे धक्कादायक खुलासे केले त्याला अती प्रमाणात ड्रग्ज घेतल्यामुळं कोकिलाबेन रुग्णालयात दाखलही करण्यात आल्याचं ती म्हणाली.
'त्याच्या फुफ्फुसावर याचा परिणाम झाला होता. माझ्या मते रुग्णालयानं ही बातमी बाहेर येऊच दिली नाही. हे प्रकरण तिथल्या तिथे मिटवण्यात आलं', असा खळबळजनक खुलासा तिनं केला. ज्यामुळं आता कंगनाला त्या अभिनेत्यानंच पोलिसांच्या ताब्यात देण्याची धमकी दिल्याचंही ती म्हणाली. मला या सर्व गोष्टी माहित होत्या, असं म्हणत जवळपास ९९ टक्के कलाविश्वात ड्रग्जचा सर्रास वापर होतो ही बाब तिनं समोर ठेवली. याच धर्तीवर आपल्यावर काही मंडळींकडून सातत्यानं आरोपही केले जात असल्याचं स्पष्टीकरण तिनं दिलं.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्या केल्यानंतर कलाविश्वामध्ये असणारी गटबाजी आणि घराणेशाही पुन्हा डोकं वर काढू लागली. ज्यामध्ये कंगना आणि इतर काही कलाकारांनी घराणेशाहीच्या विरोधात आवाज उठवत बी- टाऊनमधील प्रस्थापितांना निशाण्यावर घेतलं.