मुंबई : 'आँखो मे तेरी अजब सी अजब सी अदाएं है...', असं गाणं वाजू लागताच एक चेहरा समोर येतो. तो चेहरा म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा. सौंदर्य आणि अभिनय कौशल्याच्या बळावर दीपिकाने या कलाविश्वाच तिचं स्थान भक्कम केलं. टप्प्याटप्प्याने एक अभिनेत्री म्हणून ती खऱ्या अर्थाने खुलत गेली आणि पाहता पाहता यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत अग्रस्थानी पोहोचली. दीपिकाच्या यशाची किर्ती फक्त भारतीय चित्रपटसृष्टीपुरताच सीमीत राहिली नाही, तर हॉलिवूडमध्येही तिने विशेष छाप पाडली. तिच्या याच कामाचा आणि लोकप्रियतेचा आढावा घेत लंडन येथील जगप्रसिद्ध मादाम तुसाँ संग्रहालयाकडून तिची दखल घेण्यात आली आहे.
दीपिकाची अगदी हुबेहुब प्रतिकृती असणारा सुरेख मेणाचा पुतळा मादाम तुसाँ येथे साकारण्यात आला आहे. या पुतळ्याचं नुकतच खुद्द दीपिकाच्याच हस्ते अनावरण करण्यात आलं. यावेळी दीपिकाचा पती, अभिनेता रणवीर सिंग, तिचे आई-वडील आणि सासू- सासरे यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली होती. दीपिकाचा हा पुतळा पाहताना त्यातील बारकावे लक्षात येत आहेत. एका क्षणाला दीपिका कोण आणि तिची प्रतिकृती कोण हेसुद्धा लक्षात येत नाही, इतक्या शिताफीने हा पुतळा साकारण्यात आला आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असणाऱ्या दीपिकानेच तिच्या या पुतळ्याच्या अनावरणाची आनंदाची बातमी सर्वांपर्यंत पोहोचवली. तिने काही सुरेख फोटो पोस्ट करत ही दुसरी दीपिका सर्वांच्या भेटीला आणली. हिंदी कलाविश्वात अफलातून कामगिरी करणारी दीपिका गेल्या काही काळापासून तिच्या खासगी आयुष्याला महत्त्व देत होती. अभिनेता रणवीर सिंग याच्यासोबत विवाहबंधनात अडकल्यानंतर आता पुन्हा एकदा तिने आपला मोर्चा चित्रपट विश्वाकडे वळवला आहे. जवळपास वर्षभरानंतर दीपिका 'छपाक' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपटातून ती झळकणार आहे. वेब सीरिज विश्वातून प्रकाशझोतात आलेल्या विक्रांत मेसी याच्यासोबत ती झळकणार आहे.