VIDEO : ....त्या वागणुकीमुळे आजही मानसिक खच्चीकरण, आलियाच्या बहिणीची कबुली

एकदा आलिया आणि.....

Updated: May 1, 2019, 02:30 PM IST
VIDEO : ....त्या वागणुकीमुळे आजही मानसिक खच्चीकरण, आलियाच्या बहिणीची कबुली  title=

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या काही दिवसांपासून चित्रपट वर्तुळात अनेकदा चर्चेचा विषय ठरत आहे. मग तो तिचा चित्रपट असो किंवा रणबीरसोबतचं तिचं नातं असो. फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या बळावर वेगळी ओळख प्रस्थापित करणारी आलिया सध्या प्रकाशझोतात आली आहे ते म्हणजे तिची बहीण शाहीन हिच्या एका मुलाखतीमुळे. २०१६ मध्ये नैराश्यग्रस्त परिस्थितीविषयी खुलेपणाने लिहिणाऱ्या शाहीनने पुन्हा एकदा तिच्यासोबत घडलेल्या एका प्रसंगाच्या कटू आठवणी जागवल्या. 

चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांना दिलेल्या मुलाखतीत शाहीनने तिच्या 'Never Been (Un)Happier'  या पुस्तकातील एका संदर्भाविषयी स्पष्टीकरण दिलं. मसंद यांनी मुलाखतीच्या सुरुवातीच्याच भागात शाहीनच्या नैराश्याविषयी तिच्याकडूनच जाणून घेण्यास सुरुवात केली. ज्यावेळी त्यांनी तिच्याच पुस्तकातील एक परिच्छेद वाचला. ज्यात शाहीनने एक आठवण लिहिली होती. लहान असतेवेळी एकदा आलिया आणि शाहीन त्यांची मोठी बहीण पूजा भट्ट हिच्यासोबत एका फोटोशूटसाठी गेल्या होत्या. त्यावेळी शाहीन अवघ्या १२ वर्षांची होती. जेव्हा तिच्यासोबत घडलेला तो प्रसंग तिला आजही काहीसा हादरवुन जातो. 

शाहीनने पुस्तकात उल्लेख केल्यानुसार काही छायाचित्र टीपल्यानंतर त्या छायाचित्रकाराने तिला बाजूला होण्यास सांगितलं होतं. आलिया आणि पूजा यांच्या चेहऱ्याच बरंच साम्य असल्यामुळे, त्यांचा वर्ण उजळ असल्यामुळे आपण, गहूवर्णी आणि काहीसं स्थूल असल्यामुळेच त्याने आपल्याला दूर होण्यास सांगितलं होतं, असंही तिने त्या प्रसंगाविषयी लिहिताना सांगितलं होतं. ती आठवण आजही आपल्या मनात कालवाकालव करुन जाते हे शाहीनने मसंद यांच्या मुलाखतीत अधोरेखित केलं. 

बालपणी घडलेल्या एका घटनेचा शाहीनच्या मनावर गंभीर परिणाम झाला होता. याचविषयी सांगत ती म्हणाली, 'कोणत्याही महिलेसाठी किंवा इतरांच्याही नैराश्यासाठी अमुक एका गोष्टीप्रती असणारी शरम हेच त्यांच्या नैराश्यामागचं मुख्य कारण असतं. शरीराप्रती असणारी शरम/ लाज हीसुद्धा त्याचाच एक भाग. एखाद्या गोष्टीविषयी वाटणारी शरम हीच अनेकदा केंद्रस्थानी असते. सर्व नकारात्मक, नैराश्याच्या आणि दु:खाच्या गोष्टींमागचं मुळ कारण असते', असं शाहीन म्हणाली. परिणामी हे सारंकाही तुमचं स्वत:चं अस्तित्व इतरांकडून काय प्रतिक्रिया दिल्या जातील, ते कसे व्यक्त होती, आपल्याला नाकारणार तर नाहीत ना, याविषयीच्या भीतीमध्ये परावर्तीत होतं हा महत्तावाचा मुद्दा तिने यावेळी मांडला. आपल्यासोबतही हे असंच घडलं होतं, ज्यामुळे स्वाभिमान आणि अस्तित्वार या साऱ्याचा परिणाम झाला होता, कारण अर्थातच ते वयही तसंच होतं ही बाबही तिने न विसरता या मुलाखतीत मसंद यांच्यासमक्ष ठेवली. 

शाहीन ही आलियाची बहीण असून झगमगाटापासून ती सहसा स्वत:ला दूर ठेवते. आयुष्याच्या वाटेवर काही कठिण प्रसंगांचा सामना करत सध्या उभी असणाऱ्या टप्प्यावर आलेली शाहीन नकळतपणे अनेक नैराश्यग्रस्त तरुणींसाठी प्रेरणास्त्रोत सिद्ध होत आहे.