मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या करिअरमधील अत्यंत चांगल्या आणि तितक्याच यशस्वी टप्प्यातून जात आहे. चित्रपटांची निवड म्हणू नका किंवा मग प्रेक्षकांकडून तिच्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद म्हणू नका. आलिया खऱ्या अर्थाने यशशिखरावर आहे हेच खरं. येत्या काळातही ती अशाच काही बहुचर्चित चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे 'आरआरआर' किंवा 'RRR'.
एस.एस. राजामौली दिग्दर्शित या चित्रपटाच्या निमित्ताने आलिया प्रथमच तेलुगू चित्रपटातील भूमिका साकारत असून हा टॉलिवूडमधील तिचा पदार्पणाचा चित्रपट ठरणार आहे. ज्यासाठी तिने बरीच मेहनत घेण्यास सुरुवातही केली आहे. अभिनेता राम चरण तेज याच्यासोबत स्क्रीन शेअर करण्यास सज्ज असणारी आलिया ही तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी संधी समजत आहे.
राजामौली यांच्याविषयीसुद्धा तिने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत एक लक्षवेधी वक्तव्य केलं. ''राजामौली हे नाव माझ्या 'बकेटलिस्ट'मध्ये होतं. फक्त बाहुबली या चित्रपटामुळेच नव्हे, तर त्यांच्या कलात्मक विचारशैलीमुळे. मी त्यांचे 'मगधीरा' आणि 'एगा' हे चित्रपट पाहिले आहेत. त्यांच्या संकल्पना अद्वितीय असतात'', असं आलिया म्हणाली. राजामौलींच्या दिग्दर्शनात साकारल्या जाणाऱ्या 'आरआरआर' या चित्रपटासाठी आलिया तेलुगू भाषेचे धडेही गिरवत आहे. किंबहुना ही गोष्ट तिला काही प्रमाणात आव्हानात्मकही वाटत आहे. त्यासाठी ती एका प्रशिक्षकांची मददत घेत असल्याचंही तिने या मुलाखतीत स्पष्ट केलं.
राजामौली यांच्या दिग्दर्शनाची प्रशंसा करत प्रेक्षकांना कोणत्या प्रकारचे चित्रपट पाहायला आवडतात ही बाब अचूकपणे हेरत ते चित्रपट साकारतात असं म्हणत त्यांच्या चित्रपटांमध्ये कथा आणि भावनांची सुरेख मांडणी केलेली असते ही बाब आलियाने मांडली. सोबतच 'आरआरआर' हा चित्रपटही अशाच प्रकारचा असेल अशी आशाही तिने व्यक्त केली.
आलियाचा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये होणारा प्रवेश हा तिच्या कारकिर्दीला कलाटणीही देणारा ठरु शकतो. त्यामुळे आता या संधीचं सोनं करण्यात ती काहीच कमतरता शिल्लक ठेवत नसल्याचं कळत आहे. ज्युनिअर एनटीआर आणि इतर कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा हा चित्रपट २०, जुलै २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डीव्हीव्ही एंटरटेन्मेंटअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असून, येत्या काळातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांच्या यादीत त्याला स्थान मिळालं आहे.