'निर्लज्जपणे...,' तौबा तौबा गाण्याच्या क्रेडिटवरुन सुरु असलेल्या वादावर विकी कौशलही बोलला, 'आम्हालाच चपला, शिव्या...'

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या आपल्या 'तौबा तौबा' (Tauba Tauba) गाण्यात केलेल्या जबरदस्त डान्समुळे चर्चेत आहे. दरम्यान या गाण्याची कोरिओग्राफी करणाऱ्या बॉस्कोने (Bosco) विकीला सर्व लक्ष मिळत असल्याने नाराजी जाहीर केली होती.   

शिवराज यादव | Updated: Jul 15, 2024, 06:37 PM IST
'निर्लज्जपणे...,' तौबा तौबा गाण्याच्या क्रेडिटवरुन सुरु असलेल्या वादावर विकी कौशलही बोलला, 'आम्हालाच चपला, शिव्या...' title=

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या आपल्या 'तौबा तौबा' (Tauba Tauba) गाण्यात केलेल्या जबरदस्त डान्समुळे चर्चेत आहे. विकी कौशलच्या आगामी 'बॅड न्यूज' चित्रपटातील हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. तरुणाई विकीच्या तालावर थिरकताना दिसत आहे. पण यादरम्यान या गाण्याची कोरिओग्राफी करणाऱ्या बॉस्कोने (Bosco) विकीला सर्व लक्ष मिळत असल्याने नाराजी जाहीर केली होती. त्यातच आता विकीने 'इंडिया टुडे'शी संवाद साधताना यावर प्रतिक्रिया दिली असून बॉस्कोच्या मताशी सहमत असल्याचं म्हटलं आहे. कॅमेऱ्यामागे असणाऱ्यांना कॅमेऱ्यावर येणाऱ्यांइतकंच महत्त्व दिलं जावं असं त्याने म्हटलं आहे. स्टंट डायरेक्टरचा मुलगा असणारा विकीने चित्रपट बनवण्यासाठी अनेक लोक लागतात, त्यामुळे एकाच व्यक्तीला श्रेय मिळू नये असं विकी म्हणाला आहे. 

बॉस्कोने गाण्याला प्रसिद्धी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. पण हा ट्रेंड, प्रसिद्धी मिळत असताना कोरिओग्राफर्स दुर्लक्ष होत असल्याची नाराजीही त्याने बोलून दाखवली आहे. तौबा तौबा गाणं व्हायरल होण्यामागे कोरिआग्राफर्सचीही तितकीच मेहनत असताना, त्यांची योग्य ती दखल घेतली जात नाही असं बॉस्कोने म्हटलं आहे. 

'तौबा तौबा' गाण्याला चाहत्यांकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल विचारण्यात आलं असता विकीने सांगितलं की, "मी काय ती स्टेप माझ्या घरुन घेऊन गेलो नव्हतो. जी काही स्टेप केली ती बॉस्को सरांनी दिली".

'निर्लज्जपणे कुठेतरी...,' तौबा तौबा गाण्यासाठी विकी कौशलला मिळणारं यश पाहून बॉस्को स्पष्टच बोलला, 'वेळ आलीये की...'

 

बॉस्कोने या गाण्यावर बोलताना म्हटलं होतं की, "इंटरनेटवर सगळीकडेच विकी ज्याप्रकारे डान्स करत आहे त्याचीच चर्चा सुरु आहे. विक्कीचा डान्स शक्य झाला कारण त्यामागे एक व्यक्ती होती. कोणत्याही चुकीच्या प्रकारे समजू नका. गाण्याच्या यशाचा मलाही आनंद आहे. पण कुठेतरी मलाही निर्लज्जपणे हे सांगायचं आहे की, या गाण्यात तो ट्रेंड आणल्याबद्दल फक्त मीच नाही तर कोरिआग्राफर्सचंही सेलिब्रेशन करायला हवं, जर मी ती वाईब आणि स्टाईल दिली नसती तर मला वाटत नाही की इतकी चर्चा झाली असती. ज्याप्रकारे माधुरी आणि सरोज खान यांनी सेलिब्रेट केलं त्याप्रकारे कोरिओग्राफर्सचीही दखल घेण्याची वेळ आली आहे".

विकीने यावर सहमती दर्शवली आहे. "कॅमेऱ्याच्या मागे उभी असलेली प्रत्येक व्यक्ती हा खरा हिरो आहे जो कॅमेरासमोर जे काही घडत आहे ते घडवतो. कारण आम्ही कॅमेऱ्यासमोर आहोत. कॅमेऱ्यासमोर असल्यामुळे सुरुवातीची स्तुती, टीका, चपला किंवा काहीही असो आम्हालाचा सहन करावी लागते. पण ते खरोखरच नायक आहेत. एखादे गाणे, चित्रपट किंवा काहीही तयार करण्यासाठी टीम लागते, 300 लोकांची मेहनत लागते. जास्त काही नाही, पण त्यांचंही तितकंच कौतुक व्हायला हवं. बॉस्कोच्या म्हणण्याशी मी शंभर टक्के सहमत आहे," असं विकी म्हणाला. 

"कॅमेऱ्यामागील कर्मचारी चित्रपटात काम करताना आनंदी असणं महत्त्वाचं आहे. ते ऊर्जा देण्याचं काम करत असतात. कधीकधी तुम्हाला वाटते की तुम्ही एक चांगला चित्रपट बनवला आहे, परंतु ते या लोकांच्या ऊर्जा, आशीर्वादामुळे होते. चित्रपटात कोणत्याही एका व्यक्तीची मेहनत नसते. हे टीमचं एकत्रित काम असतं," असं विकीने सांगितलं. 

"सर्वात कठीण काम स्पॉटबॉय, एडिटर आणि लाइटिंग क्रू यांचं असतं. त्यांना दोन तास लवकर यावे लागतं आणि त्यांना सर्वाधिक ओरडा खावा लागतो. पण माझ्या लक्षात आले आहे की ज्या चित्रपटांमध्ये यांना पैसे दिले जात नाहीत ते कधीही यशस्वी होत नाहीत. हे लोक सर्वात जास्त परिश्रम करतात, आपण सर्वांनी त्यांच्यावर प्रेम आणि आदर केला पाहिजे," अशी अपेक्षा विकीने व्यक्त केली आहे.