पाहा भारतीय क्रिकेट संघाची 'लकी चार्म'

अशी लकी चार्म ...

Updated: Aug 29, 2019, 03:34 PM IST
पाहा भारतीय क्रिकेट संघाची 'लकी चार्म' title=

मुंबई : नशिबावर कोणाचा विश्वास आहे? असा प्रश्न विचारल्यास बऱ्याचजणांचं उत्तर हे होकारार्थी येतं. जीवनात प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काहीतरी निमित्त असतं आणि त्या निमित्तामागे अनेक योगायोगही असतात. नशीब, योगायोग वगैरे वगैरे या साऱ्या गणिताची उत्तरं अनेकदा मिळतही नाहीत. पण, तरीही यावर विश्वास ठेवला जातो हेच खरं. 

नशिबाची खेळी, योगायोगाची गोष्ट या साऱ्याचे धागे थेट भारतीय क्रिकेट संघाशी जोडत एक धमाल कथानक 'द झोया फॅक्टर' या चित्रपटाच्या रुपाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि दाक्षिणात्य अभिनेता दुल्कर सलमान यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचं नाव आहे, 'द झोया फॅक्टर'. 

स्वत:च्या आयुष्यात अनेक अडथळ्यांचा आणि अडचणींचा सामन करणारी मुलगी भारतीय क्रिकेट संघासाठी कशा प्रकारे चक्क त्यांची 'लकी चार्म' ठरते आणि तिचं आयुष्य कशा प्रकारे बदललं जातं याचं चित्रण ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. 

'द झोया फॅक्टर'मध्ये दुल्कर एका क्रिकेटपटूच्या रुपात दिसत आहे. झोयाचं नशीब आणि क्रिकेट संघाला तिच्या नशीबामुळे मिळणारं यश पाहता एका टप्प्यावर आल्यानंतर हेच नशीब पुन्हा कोणतं वळण घेणार हे चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. अभिषेक शर्मा दिग्दर्शित या चित्रपटातून एका नव्या जोडीची केमिस्ट्री तितक्याच विनोदी अंदाजात पाहता येणार आहे. २० सप्टेंबरला हा चित्रपट आणि ही लकी चार्म सर्वांच्या भेटीला येणार आहे.