...म्हणून सलमानने स्वत:लाच मारले चाबकाचे फटके

पोतराज सलमानला असं काय म्हणाले...? 

Updated: Sep 1, 2019, 09:01 AM IST
...म्हणून सलमानने स्वत:लाच मारले चाबकाचे फटके  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : सलमान खान हा त्याच्या अभिनय कौशल्यासोबत आणखी एका कारणासाठी ओळखला जातो. कधी हा अभिनेता चाहत्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधतो, कधी त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावतो तर कधी त्यांच्या वेदनाही सहन करतो. वेदना सहन करतो असं म्हणण्याचं कारण की, 'दबंग ३' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असणाऱ्या सलमानने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये सलमान खान हा पोतराजांसोबत संवाद साधताना दिसतो. 'फटका पडता है क्या...?', असं विचारत तो त्यांच्या या वेदनेविषयी जाणून घेण्याचाही प्रयत्न करतो. मुख्य म्हणजे खुद्द सलमानही त्यांच्या वेदना नेमक्या काय असतात हे जाणून घेण्यासाठी स्वत:वरही चाबकाचे फटके मारत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. 

'त्यांच्या वेदना वाटून घेण्यात आनंदच आहे.... ', असं कॅप्शन देत समाजातील प्रत्येक वर्गासाठी किंबहुना त्या वर्गासोबत आपण असल्याची भावनाच जणू सलमानने या व्हिडिओच्या कॅप्शनमार्फत व्यक्त केली. शिवाय आपलं अनुकरण अनेक लहान मुलं करत असल्याचं लक्षात घेता त्यांनी कृपया या कृतीचं अनुकरण करु नये, असा इशाराही त्याने दिला. 

खुद्द कलाविश्वातील भाईजान सलमान आपल्याशी संवाद साधत आहे, हे पाहता पोतराजांतच्या चेहऱ्यावरील कुतुहलपूर्ण आनंद सर्वांचं लक्ष वेधून गेला. यावेळी सलमानने त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या इतरही पोतराजांसोबत संवाद साधत त्यांच्यासोबत फोटोही काढला. 'दबंग ३'च्या चित्रीकरणात व्यग्र असणारा सलमान चित्रीकरणाच्या निमित्ताने विविध ठिकाणांना भेट देत आहे. यावेळी तो चित्रीकरणातून उसंत मिळताच मोकळ्या वेळात अनेकांची भेट घेत त्यांच्याशी संवादही साधताना दिसतो. हा 'दबंग खान' त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याविषयीची माहितीसुद्धा देतच असतो.