बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते असतानाही आणि इतक्यांच्या ओळखी असूनही पंकज कपूर यांनी कधीही इतर सेलिब्रिटींप्रमाणे आपला मुलगा शाहीद कपूरला करिअरमध्ये मदत केली नाही. पंकज कपूर यांनी ना शाहीद कपूरला एखाद्या सेलिब्रिटी मुलाप्रमाणे लाँच केलं, ना चित्रपट मिळवण्यासाठी मदत केली. पंकज कपूर यांनी इंडिया टु़डेला दिलेल्या मुलाखतीत यामागील नेमकं कारण सांगितलं आहे. आपली मूल्य, तत्वं या निर्णयामागे होती असा खुलासा त्यांनी केला आहे. पंकज कपूर सध्या त्यांचा आगामी चित्रपट 'बिन्नी और फॅमिली'चं प्रमोशन करत आहेत.
शाहीद कपूरला लाँच करण्याबाबत विचारण्यात आलं असता पंकज कपूर यांनी आपला कुटुंबातील सदस्याला फिल्म इंडस्ट्रीत लाँच करण्यावर विश्वास नाही असं सांगितलं.
"माझा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा प्रवास स्वतः करता आला पाहिजे. त्याने स्वतःची सुरुवात स्वत: करू शकली पाहिजे. हेच माझ्या वडिलांनी मला शिकवलं. ते म्हणाले, 'तुम्ही चर्चा करू शकता, तुम्ही सूचना घेऊ शकता. आपण नेमकं काय करु शकतो या टप्प्यावर पोहोचू शकतो. पण निर्णय तुमचाच असायला हवा. हा प्रवास माझा नाही तर तुमचा असल्याने पहिलं पाऊल तुम्हाला उचलावं लागेल. एकदा पाऊल उचलल्यावर जरी तुम्ही अडखळलात तरी पुन्हा कसं उठायचं आणि चालायचं हे तुम्हाला समजेल. जर तुम्हाला चालता आणि धावता येत असेल तर तुम्ही म्हणू शकाल, 'मी ते केले'. माझ्या वडिलांनी मला हे करण्यास सांगितले नाही, माझ्या यशासाठी माझी आई, माझे काका किंवा इतर कोणीही जबाबदार नाही,” असं पंकज कपूर यांनी सांगितलं.
शाहीद कपूरला लाँच केलं नसलं तरी पंकज कपूर आपल्या मुलासाठी एक मेंटॉर, मार्गदर्शक म्हणून नेहमी हजर होते. "तुमच्या यशाची जबाबदारी तुम्हीच असायला हवी जेणेकरून तुम्हाला तो आत्मविश्वास मिळेल. तो आत्मविश्वास तुम्हाला आयुष्यभर घेऊन जाईल. नाहीतर, तुम्ही आयुष्यभर, तुम्हाला मदत करण्यासाठी कोणीतरी शोधत राहाल. एकदा ते तुमचे वडील होते, नंतर तो निर्माता असू शकतो, ते प्रॉडक्शन हाऊस असू शकते, हे कॉर्पोरेट हाऊसेस असू शकतात. तुम्हाला स्वतःवर विश्वास असणे आवश्यक आहे की 'मला जसे वाटते तसे मी केले पाहिजे,' असंही त्यांनी सांगितलं.
पुढे ते म्हणाले की, "एकदा तुम्ही हे केलंत तर तुम्ही तुमच्या पायावर उभे राहू शकता आणि आत्मविश्वासाने पुढील अडथळे पार करु शकता. आज जर त्यांच्यातील कोणी यशस्वी असेल तर त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आहेत. त्यांचं व्यक्तिमत्व, प्रामाणिकपणा, कष्ट यामुळे आहेत. त्यामुळे त्यांना मागे वळून माझ्या वडिलांनी माझ्यासाठी हे केलं असं सांगायची गरज नाही".
शाहीद कपूरने 2003 मध्ये 'इश्क विश्क' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने उडता पंजाब, कमिने, हैदर, जब वी मेट अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.