वॉचमन ते 'गणेश गायतोंडे'.... तो संघर्ष सोपा नव्हता- नवाजुद्दीन सिद्दीकी

आपण या शहराच्या वेगाशी काही मिळतंजुळतं घेऊ शकत नाही, असंच त्याला वाटत होतं.

Updated: Mar 15, 2019, 04:02 PM IST
वॉचमन ते 'गणेश गायतोंडे'.... तो संघर्ष सोपा नव्हता- नवाजुद्दीन सिद्दीकी  title=

मुंबई : 'कभी कभी लगता है अपुनीच भगवान है...' असं म्हटलं की एक चेहरा समोर येतो, कानात एकच आवाज घुमू लागतो. तो चेहरा आणि तो आवाज असतो गणेश गायतोंडे या पात्राला जीवंत करणाऱ्या अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचा. एक अभिनेता म्हणून नवाज हा त्याच्यातच कोणा एका विद्यापीठाहून कमी नाही, असं अनेकांचच मत. अर्थान ते पटक नाही असं म्हणणारेही फार कमी. 'मंटो' म्हणू नका किंवा मग 'गणेश गायतोंडे'; आपल्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका नवाजने तितक्याच ताकदीने निभावली आहे. आज तो ज्या स्थानावर आहे ते पाहता अभिनेता म्हणून त्याचा संघर्षही तितकाच महत्त्वाचा होता यावर विश्वास बसतो. 

'ह्युमन्स ऑफ बॉम्बे'शी संवाद साधताना अभिनेता म्हणून आपण कसे संपन्न होत गेलो यावरुन नवाजने पडदा उचलला आहे. सोबतच स्वप्ननगरी मुंबईच्या या झगमगत्या विश्वात आल्यांनंतर या शहराकडे पाहण्याचा त्याचा काय दृष्टीकोन होता आणि याच दृष्टीकोनातून तो कसा घडत केला याची नवाजने शब्दांत मांडणी केली आहे. मुंबईच्या वेगाशी जुळतं घेण्यासाठी नवाजला जवळपास महिनाभराचा काळ लागला. आपण या शहराच्या वेगाशी काही मिळतंजुळतं घेऊ शकत नाही, असंच त्याला वाटत होतं. पण, अखेर अनपेक्षित गोष्ट घडली आणि नवाजही या शहराचा झाला. रामलीला, नाटक अशा कार्यक्रमांतून अभिनेता होण्याची स्पप्न पाहणाऱ्या नवाजने बालपणी नेहमीच स्वत:ला रामाच्या भूमिकेत पाहिलं.

कुटुंबाच्या पाठिंब्याने तो या शहरात स्थिरावला. मेहनत घेऊ लागला. कोथिंबीर विकण्यापासून, वॉचमनपर्यंतची कामं त्याने केली, अभिनयाच्या कार्यशाळा घेतल्या. पडेल ते काम केलं. एका लहानशा भूमिकेसाठी जवळास शंभरवेळा त्याने ऑडिशनही दिल्या. आपली पात्रता सिद्ध करण्यासाठीचा हा एकंदर संघर्ष कधीच सुखावह नव्हता. तो एक संघर्षच होता... असं नवाज निकषून सांगतो. संघर्ष कसाही असो, त्याला सामोरं जात स्वत:ची छाप पाडण्यात अखेर तो यशस्वी झाला. 

'मुन्नाभाई एमबीबीएस' या चित्रपटातील कोणाच्या लक्षातही आली नसावी इतकी लहान भूमिका ते 'लंचबॉक्स' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावण्यापर्यंतची मजल नवाजने मांडली. इतरांवर लक्ष ठेवणाऱ्या वॉचमनपासून नवाज लक्ष वेधणारा प्रतिभावंत अभिनेता झाला आणि खऱ्या अर्थाने त्याने 'सर्वशक्तिशाली.... गणेश गायतोंडे....' या संवादातील 'सर्वशक्तिशाली' हा शब्द सार्थ ठरवला असंच म्हणावं लागेल.