Nawazuddin siddiqui : मायानगरी मुंबईत येऊन स्वत: ची ओळख निर्माण करणं हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं. याला सिनेविश्व देखील अपवाद नाही. देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून कलाविश्वात नशीब अनुभवण्यासाठी कलाकार फिल्मसिटीमध्ये दाखल होतात.
छोट्याशा गावातून बॉलिवूडचा टॉप अभिनेता म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन. नवाजने नुकतंच एका मुलाखतीत त्याच्या करीयरच्या सुरुवातीच्या आठवणी सांगितल्या आहेत. वाज म्हणतो, 'इतर कलाकारांप्राणेच मला ही या इंडस्ट्रीत यायला संघर्ष करावा लागला. उत्तर प्रदेशच्या छोट्याशा गावातून मुंबईत येऊन इतकी लोकप्रियता मिळवणं सोपं नव्हतं. छोट्या मोठ्या मिळेल त्या सिनेमात आणि सिरीयलमधून अभिनयाला मी सुरुवात केली. चांगले सिनेमे, चांगल्या भूमिका मिळण्यासाठी तुम्हाला तुमच्या कामात सातत्य ठेवावं लागतं. प्रत्येक चांगली गोष्ट घडण्याआधी तुम्हाला कठीण परिक्षा द्यावी लागते. अभिनय क्षेत्रात टिकून राहण्यासाठी संयम सर्वात महत्त्वाचा आहे.'
अभिनयाचं क्षेत्र हे अस्थिर आहे. तुम्ही एकाच वेळी खूप भूमिका निभावत असता किंवा कधी कधी तुमच्याकडे कोणतं ही काम नसतं. पडद्यावर दिसणारं आयुष्य जितकं सुंदर वाटतं, तितकं ते खऱ्या जगात तसं नसतं. म्हणूनच कलाकार मंडळी सर्वात जास्त नैराश्यात जातात, ही वस्तुस्थिती तो या मुलाखतीच्या निमित्तानं मांडतो. 'एकीकडे तुमचं काम तर दुसरीकडे तुमचं कुटुंब आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वत: असता', असं सांगताना नवाज म्हणतो, 'जेव्हा मला मानसिक ताण तणाव जाणवतो तेव्हा मी, गावी जातो. गावी मी माझ्या मित्रांसोबत वेळ व्यतीत करतो, तेव्हा माझ्या मनावरचं ओझं हलकं होतं. मी स्वत:शी खूप बोलतो. जेव्हा माझं काहीतरी बिनसतं तेव्हा. मी स्वत: च्या कानशिलात लगावतो आणि स्वत:ला सांगतो की, माझ्याकडे सगळं काही असताना ही मी का उदास राहतोय? मला देवाने सगळं काही दिलयं त्याचा मी आदर करायला हवा'.
शहरात येऊन तुम्ही पैसे कमवता, नाव मिळवता पण जगण्यातलं खरं समाधान गावी मिळतं. गाव आणि शहरात खूप अंतर आहे. गावची माणसं दिलखुलास असतात, ते मनात कधीच राग ठेवत नाही. याउलट शहरातील माणसं मुखवटा घेऊन वावरतात, असं त्यानं या मुलाखतीत स्वानुभवातून सांगितलं.कितीही प्रकाशझोतात असलो तरीही माझा खरा आनंद माझ्या गावाकडेच आहे, असंही त्यानं या मुलाखतीत न विसरता सांगितलं. लहानशा गावातून मुंबईत येऊन स्वत:ची ओळख बनवू पाहणाऱ्या नवाजनं त्याचा अनुभव सांगत मानसिक तणाव किती गंभीर असू शकतो हेच नकळत सर्वांपुढे स्पष्ट केलं.