#MeToo 'हाऊसफुल्ल 4' मध्ये नाना कायम

या प्रकरणाला रोज मिळतंय नवं वळण...

Updated: Oct 18, 2018, 08:16 AM IST
#MeToo 'हाऊसफुल्ल 4' मध्ये नाना कायम title=

मुंबई: अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर त्यांच्या अडचणींमध्ये दिवसागणिक वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. आपल्यावर होणारे आरोप पाहता नानांनी या चित्रपटातून काढता पाय घेतला. पण, त्यांचा सहभाग असणाऱ्या या चित्रपटातील काही महत्त्वाच्या दृश्यांचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांना या साऱ्याचा फटका खऱ्या अर्थाने बसला असंच म्हणावं लागेल. 

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाना पाटेकर यांच्या जागी 'हाऊसफुल्ल 4' मध्ये अभिनेता जॅकी श्रॉफ यांची वर्णी लागली आहे. पण, तरीही नानांचा सहभाग असणाऱ्या दृश्यांना वगळण्यात येणार नसल्याचं आता म्हटलं जात आहे. 

काही दिवसांपूर्वी राजस्थामध्ये नानांनी या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हजेरी लावली होती. शिवाय ज्या दृश्यांचं चित्रीकरण करण्यात आलं आहे ती दृश्यं चित्रपटाच्या कथानकाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असल्याचं म्हटलं जात आहे. 

चित्रपटाच्या दृष्टीने विचार करता आता नानांचा सहभाग असणारी दृश्य पूर्णपणे एडिट करण्यात येणार नाहीत. त्यामुळे अडचणीच्या काळात नानांना हा एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे, असंच म्हणावं लागेल. 

दरम्यान, या चित्रपटात आणखी एक बदल करण्यात आल्याचं कळत आहे. लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर साजिद खानने या चित्रपटाच्या दिग्दर्शनातून काढता पाय घेतला. 

साजिदने हा चित्रपट सोडल्यानंतर आता त्याच्या दिग्दर्शनपदाची धुरा फरहाद समजी यांनी घेतल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे 'हाऊसफुल्ल 4'च्या  बुडत्या नौकेला कुठेतरी आधार मिळाला असं म्हणणं वावगं ठरणार नाही.