मुंबई: अभिनेत्री, मॉडेल तनुश्री दत्ता हिने केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर अभिनेते नाना पाटेकर यावर काय प्रतिक्रिा देणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. किंबहुना मुंबईत परतल्यानंतर नाना पत्रकार परिषद घेणार हेसुद्धा निश्चित झालं होतं. पण, काही कारणास्तव ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे.
सोमवारी ही पत्रकार परिषद होणं अपेक्षित होतं. पण, रविवारीच ती रद्द झाल्याचं सांगण्यात आल्यामुळे नव्या चर्चांनी डोकं वर काढलं आहे.
येत्या काही दिवसांमध्ये नाना पत्रकार परिषद घेणार असून, त्याविषयीच्या तारख्या मात्र अद्यापही सांगण्यात आलेल्या नाहीत.
दरम्यान हाऊसफुल्ल ४ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी नाना मुंबईबाहेर असतानाच या प्रकरणाने डोकं वर काढलं.
काही दिवसांपूर्वीच ते ज्यावेळी मुंबईत परत आले तेव्हा माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याभोवती गराडा घातल तनुश्रीने केलेल्या आरोपांविषयी प्रश्न विचारले.
माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरं देत नानांनी तिने लावलेल्या आरोपांचं खंडन केलं आणि ती जे काही सांगतेय ते खोटं असल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान, नानांच्या वकिलांनी तनुश्रीला कायदेशीर नोटीसही पाठवली.
एकिकडे नानांची नोटिस तनुश्रीपर्यंत पोहोचत नाही तोच तिनेही पोलिसांची मदत घेत २००८ मधील 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते नाना पाटेकर, नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
तेव्हा आता येत्या काही दिवसांमध्ये नानांची पत्रकार परिषद आणि तनुश्रीने दाखल केलेली तक्रार पाहता गोष्टी लवकरात लवकर स्पष्ट होण्याच चिन्हं नाकारता येत नाही.