मुंबई : बराच काळ, जवळपास दहा वर्षे हिंदी कलाविश्वापासून दूर राहिलेल्या अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने तिच्यासोबत घडलेल्या एका वाईट प्रसंगाचा खुलासा केला होता. अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर तिने गैरवर्तणुकीचे गंभीर आरोप लावले होते. आता कुठे हे प्रकरण शांत होत होतं, तोच पुन्हा त्याला एक नवं वळण मिळालं आहे.
मिड डेमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार ओशिवरा पोलीस स्थानकात नोंदवण्यात आलेल्या जबाबांपैकी कोणताच जबाबात आणि तनुश्रीने नानांवर केलेल्या आरोपांमध्ये साधर्म्य आढळलेलं नाही. कोणत्याच साक्षीदारालाला तनुश्रीने सांगितलेल्या घटनाक्रमापैकी काहीच आठवत नसल्याची बाब समोर येत आहे. तितकच नव्हे, तर अभिनेत्री डेझी शाह जी 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या वेळी सहायक नृत्यदिग्दर्शिकेचं काम पाहात होती, तिनेही आपल्याला दहा वर्षांपूर्वी घडलेल्या कोणत्याच घटना लक्षात नसल्याचं सांगितलं आहे.
पोलिसांनी आतापर्यंत १२ ते १५ जबाब नोंदवले आहेत. पण, त्यापैकी कोणीच तो घटनाक्रम मात्र सांगितलेला नाही. त्यामुळे दहा वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं हा प्रश्न मात्र कायम राहत आहे. या सर्व प्रकरणावर खुदद् तनुश्रीनेही प्रतिक्रिया दिली आहे.
ते साक्षीदार होते तरी कोण?, असा प्रश्न तिने उपस्थित केला. ते माझ्या बाजूने होते की नानांच्या? ते नानांचे मित्र असतील तर ते माझ्या आणि त्यांच्या साक्षीत फरक हा आढळणारच. माझं शोषण झालं होतं, हे सिद्ध करण्यासाठी मला कोणा साक्षीदाराची गरज नाही', असं ती म्हणाली.
साक्ष देण्यासाठी आम्हाला साक्षीदारांची समजूत काढण्यात बऱ्याच अडचणी आल्या होत्या. कारण, त्यांच्यामध्ये एक प्रकारची भीती होती. त्यामुळेच ज्यांना खरं काय, ते ठाऊक होतं त्यांच्याऐवजी आता खोटे साक्षीदार उभे करुन त्यांच्याकडून खोटी साक्ष घेण्यात आल्याचा आरोपही तिने केला. दरम्यान, तनुश्रीने नाना पाटेकर यांच्याविरोधात दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणी आता पुढे कोणती माहिती समोर येणार की या प्रकरणाला पूर्णविराम मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.