मुंबई : वर्षाच्या सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर 'टोटल धमाल' केल्यानंतर अजय देवगण पुन्हा एकदा कॉमेडीचा तडका लावण्यासाठी तयार आहे. अजय देवगण स्टारर 'दे दे प्यार दे' शुक्रवारी १७ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. परंतु प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. प्रदर्शनाच्या एक दिवस आधी चित्रपटावर सेन्सॉर बोर्डने कात्री लावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाला सेन्सॉर बोर्डने यू/ए प्रमाणपत्र दिलं आहे. पंरतु चित्रपटाला यू/ए प्रमाणपत्रासह ३ बदलांसह प्रदर्शित करण्याचं सांगण्यात आलं आहे. 'बॉलिवुडलाइफ'ने दिलेल्या वृत्तानुसार, सेन्सॉर बोर्डने चित्रपटातील 'वड्डी शराबन' गाण्यात काही बदल करण्यास सांगितलं आहे. या गाण्यातील रकुल प्रीतच्या हातात व्हिस्कीची बाटली आहे. संपूर्ण गाण्यात व्हिस्कीची बाटली हातात घेऊन रकुलने डान्स केला आहे. आता सेन्सॉर बोर्डने व्हिस्कीच्या बाटलीऐवजी हातात फुलांचा गुच्छ देण्यात यावा असं म्हटलंय. याशिवाय सेन्सॉर बोर्डने चित्रपटातील दोन संवादांवरही आक्षेप व्यक्त केला आहे.
चित्रपटात अजय देवगण ५० वर्षीय व्यक्तीची भूमिका साकारत असून तो २६ वर्षीय मुलगी रकुल प्रीतच्या प्रेमात पडल्याचं दाखवण्यात आलं आहे. चित्रपटात तब्बू अजय देवगणच्या पत्नीच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अजय देवगन, लवरंजन आणि भूषण कुमार यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून अकीव अली यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.