वयाच्या अंतरावरुन खिल्ली उडवणाऱ्यांनो, ऐका मिलिंद- अंकिताची प्रेमकहाणी

त्यांच्या वयात तब्बल २६ वर्षांचं अंतर आहे. 

Updated: Sep 11, 2019, 01:53 PM IST
वयाच्या अंतरावरुन खिल्ली उडवणाऱ्यांनो, ऐका मिलिंद- अंकिताची प्रेमकहाणी title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : प्रेम ही एक अशी भावना आहे जी शब्दांच्या व्याख्येमध्ये मुळात गुंफताच येत नाही. प्रेमाची परिभाषा ही प्रत्येकासाठी वेगळी आहे. हेच पटवून देणारा एक सुरेख आणि तितकाच प्रभावी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ज्या माध्यमातून 'आयर्न मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिना कोनवार यांच्या नात्याची सुरेख बाजू सर्वांसमोर आली आहे. 

एका जाहिरातीच्या निमित्ताने मिलिंद आणि अंकिताने त्यांच्या या नात्याविषयी इतरांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत हेसुद्धा जाणून घेतलं. कोणी अंकिताने मिलिंदला पापाजी म्हणावं असा सल्ला दिला आहे. तर, कोणी तिला संधीसाधू म्हटलं आहे. अंकिता आणि आपल्या नात्यावर होणाऱ्या या टीका पाहता, मिलिंद आणि तिने त्यांच्या या नात्याची अतिशय सुरेख बाजू सर्वांसमोर आणली. 

अंकिताला पहिल्यांदाच पाहिल्यावर आपल्या मनात कोणत्या भावना होत्या याविषयी सांगताना मिलिंदने त्याच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. तर, अंकितानेही या नात्याविषयी तिचं मत सर्वांसमोर मांडलं. 'तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीसोबत आहात ज्यामुळे समाजाला आनंद होतोय. पण तुम्ही स्वत: मात्र आनंदात नाहीत. मग, अशा नात्याचा काय उपयोग? असा प्रश्न अंकिताने उपस्थित केला. प्रेम करण्यासाठी कोणत्याही गोष्टींचा अडथळा येता कामा नये, असं म्हणत यामध्ये भावनांनाच सर्वतोपरी प्राधान्य देण्यात यावं ही विचार मिलिंदने मांडला.