मुंबई : अभिनेता इरफान खान सध्याच्या घडीला त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. ‘अंग्रेजी मीडियम’ असं त्याच्या चित्रपटाचं नाव आहे. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या हिंदी मीडियम’ या चित्रपटाचा हा सिक्वल. सध्या परदेशात या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु आहे.
उदयपूरमधील चित्रीकरण संपवल्यानंतर चित्रपटाची संपूर्ण टीम परदेशी रवाना झाली, जेथे पुढील चित्रीकरण होणार आहे. काही दिवस परदेशात न्यूरोएंडोक्राईन ट्युमर या दुर्धर आजारावर उपचार घेतल्यानंतर इरफान ‘अंग्रेजी मीडियम’च्या सेटवर परतला. त्यावेळी या ठिकाणी त्याला मोठी आपलेपणाची वागणूक मिळाली. प्रत्येकजण त्याची काळजी घेण्यालाच प्राधान्य देत होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठरलेल्या वेळापत्रकाचं गांभीर्य लक्षात घेत इरफनने त्याचा दिेला शब्द पाळला होता. संपूर्ण टीमला त्याच्याविषयी आत्मियता होती. किंबहुना चित्रपटाच्या चित्रीकरणासाठीच्या वेळापत्रकाची आखणी ही इरफानच्याच वेळेला अंदाजात घेत करण्यात आली होती. चित्रीकरणादरम्यान त्याचा वेळ अगदी सुरेखपणे व्यतीत होईल याकडे जाणिवपूर्वक लक्ष देण्यात आलं होतं. तर, त्याला काय गोष्टी हव्या-नको याविषयी चित्रपटाच्या टीममधील सदस्यांनाही कल्पना देण्यात आली होती. त्यामुळे इरफानप्रती असणारी सर्वांचीच ही वागणूक त्याच्यासाठी अधिक खास होती.
दरम्यान, चित्रपटाच्या सेटवर इरफान सध्याच्या घडीला त्याच्या जुन्या चित्रपटांच्या स्क्रिप्ट वाचत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘स्टोरिटेलिंग’ किंवा एखादी कथा सांगण्याचं कौशल्य कसं असतं, याविषयीचा अभ्यास करण्यासाठी तो या स्क्रिप्ट वाचत आहे. यामागे जुन्या कामाशी जोडलं जाण्याची भावना आहे, शिवाय नव्या कामासाठीची प्रेरणाही आहे. इरफानचा हा अंदाज पाहता, म्हणूनच कलाविश्वात त्याचं स्थान काही और आहे असं म्हणायला हरकत नाही.