मुंबई : एक वेळ अशी होती जेव्हा बॉलिवूडमध्ये 'गोंविदा' राज करत होता. पण गेल्या काही वर्षात त्याचे फिल्मी करिअर उड्डआम भरण्यात अयशस्वी ठरल्याचे दिसत आहे. बॉलीवूडमध्ये त्याचे जादू न चालल्याने निराश झालेल्या गोविंदाने मोठा निर्णय घेतला आहे.
गोविंदा भोजपुरी सिनेमात आपले नशीब आजमावणार असल्याचे वृत्त आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हलफा मचाके गईल या सिनेमात गोविंदा दिसणार आहे.
हिंदी सिनेमांमधील गाण्यांवर थिरकताना आपण गोविंदाला पाहिले आहे. आता या भोजपुरी सिनेमात तो आपल्या कॉमिक स्टाईमध्ये डान्स करताना दिसणार आहे.
यासाठी मोठा फिल्म सेट उभारल्याचेही वृत्त आहे.
या सिनेमात अभिनेत्री संभावना सेठदेखील दिसणार असल्याचे बोलले जात आहे. या सिनेमाचा मुहूर्त मुंबईच्या मढ आयर्लंड येथील नंदावनमध्ये करण्यात आला. त्यावेळी संभावना सेठचा नृत्याविष्कारही पाहायला मिळालाय.
या सिनेमानंतर भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीला एक सुपरस्टार मिळणार असल्याचे बोलले जात आहे. अभिनेता राघव नय्यर या सिनेमातून पदार्पण करणार आहे.
शिप्रागौर ही देखील यामध्ये दिसणार आहे. बॉलीवूडमधील अनेक मोठे कलाकार या सिनेमात दिसणार आहेत. येणाऱ्या दिवसात यांच्या नावावरील पडदा उघडला जाणार आहे.
सिनेमाच्या शुटींगसाठी टीम गुजरातमधील हल्लोस येथे पोहोचण्यासाठी निघाली आहे.
गोविंदाचे नशिब या सिनेमाने बदलणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.