मुंबई : घराणेशाहीचा मुद्दा कायमच कलाविश्वात दोन गट पाडून काही वादांना वाव देतो. अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर याच धुमसणाऱ्या विषयावर पुन्हा एकदा ठिणगी पडली आणि एकच भडका उडाला. सेलिब्रिटींच्याच मुलांना कलाविश्वात प्रथम प्राधान्य दिलं जातं, असे गंभीर आरोप काही बड्या निर्माते आणि दिग्दर्शकांवर करण्यात येत आहेत. पण, काही स्टारकिड्सचं मात्र याबाबत काही वेगळंच मत आहे.
घराणेशाहीच्या मुद्द्यावर आपलं मत अगदी ठामपणे मांडणारी अशीच स्टारकिड आहे, विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर यांची मुलगी जेमी लिव्हर. 'मिड डे'शी संवाद साधतेवेळी जेमीनं सर्वच कलाकारांच्या मुलांच्या बाबतीच असं घडत नसल्याचं वास्तव सर्वांपुढे ठेवत स्वत:चं उदाहरण दिलं. बॉलिवूडमध्ये घराणेशाहीपेक्षा पक्षपातीपणाला जास्त वाव दिला जातो, असं मत तिनं मांडलं.
'मी माझ्याच प्रवासाविषयी सांगते. एका कलाकाराची मुलगी म्हणून मी हे सांगते. किंबहुना मला असं म्हणवून घ्यायला आवडत नाही. पण, सर्व कलाकारांच्या मुलांना या घराणेशाहीच फायदा होतोच असं नाही. मी या कलाजगतात अत्यंत खडतर प्रवास केला आहे. इथं घराणेशाहीपेक्षा पक्षपातीपणाचं प्रमाण जास्त आहे', असं जेमी म्हणाली.
चित्रपट वर्तुळामध्ये अमुक एका मित्राच्या मुलांना प्राधान्य दिलं जातं, किंवा अमुक एका गटाला प्राधान्य दिलं जातं, असा खुलासा तिनं केला. आपल्या वडिलांनी त्यांचं काम हे काम म्हणूनच केलं. त्यांनी याकडे संपूर्ण आयुष्याच्या दृष्टीकोनानं पाहिलं नाही. ते चित्रीकरणासाठी जायचे, चित्रीकरणानंतर घरी यायचे, हेच त्यांचं आयुष्य होतं; असं म्हणत कुटुंब, मित्रमंडळी आणि अध्यात्मातच ते जास्त रमले असं जेमीनं सांगितलं.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी भन्साळींच्या चौकशीदरम्यान नेमकं काय घडलं?
कोणत्याही सेलिब्रिटी पार्टी, कोणताही गट यांच्याशी आपण किंवा आपलं कुटुंब संलग्न नसल्याचं सांगच जेमीनं एक वेगळंच चित्र सर्वांपुढं ठेवलं. आतापर्यंतच्या प्रवासात कधीच वडिलांच्या नावाचा वापर न केल्याचं जेमीनं यावेळी आवर्जून सांगितलं. एकिकडे घराणेशाहीची उदाहरणं म्हणून अनेक सेलिब्रिटींच्या मुलांची किंवा काही गटांची नावं पुढे येत असतानाच जेमीनं केलेला हा उलगडा पुन्हा एकदा या झगमगणाऱ्या पडद्यापलीकडचा काळोखच सर्वांपुढे आणत आहे.