मुंबई : सेलिब्रिटी आणि त्यांच्या खासगी आयुष्याविषयी चाहत्यांमध्ये नेहमीच कुतूहलाचं वातावरण असतं. पण, अनेकदा सेलिब्रिटींच्या कुटुंबीयांना या साऱ्याचा सामना करावा लागतो. अभिनेता अजय देवगण याच्या मुलीलाही सध्या अशाच परिस्थितीतून जावं लागत आहे. मुख्य म्हणजे अजयनेही त्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
अजय देवगण आणि काजोल यांची मुलं युग, न्यासा जेव्हा जेव्हा माध्यमांसमोर येता तेव्हा प्रत्येक वेळी त्यांची एक झलक टीपण्यासाठी छायाचित्रकारांमध्ये झुंबड उडते. काही दिवसापूर्वी विमानतळावर अजयच्या मुलीचे म्हणजेच न्यासाचे असेच काही फोटो टीपण्यात आले. सोशल मीडियावर हे फोटो चर्चेतही आले. पण, एका वेगळ्या कारणांमुळे.
लाँग लेंथ डेनिम शर्ट ड्रेसमध्ये न्यायासे काही फोटो टीपण्यात आले, ज्यावरुन तिच्यावर काही नेटकऱ्यांनी टीका केली, काहींनी शेलक्या शब्दांत तिची खिल्लीही उडवली. आपल्या मुलीविषयी होणाऱ्या या चर्चा आणि शेलक्या शब्दांत उडवली जाणारी खिल्ली पाहता अजयने या सर्व प्रकारावर निराशाजनक प्रतिक्रिया दिली. 'हिंदुस्तान टाईम्स'शी संवाद साधताना त्याने आपली भूमिका स्पष्ट केली. 'ती फक्त १४ वर्षांची आहे. लोक हीच बाब विसरले असून, वाटेल ते बोलत आहेत. तिने लांब ड्रेस घातला होता. तोकडी पँटही घातली होती. आता त्या ड्रेसची लांबी जास्त असल्यामुळे तिची विजार (पँट) दिसली नाही. याचमुळे तिची खिल्ली उडवली गेली.....', असं म्हणत अजयने नाराजी व्यक्त केली. न्यासावर टीका करणाऱ्यांच्या मानसिकतेवरच प्रश्नचिन्हं उपस्थित करत या साऱ्याची किंमत आम्हाला फेडावी लागत असल्याचं तो म्हणाला.
निदान सेलिब्रिटींच्या मुलांना तरी छायाचित्रकारांनी एकटं सोडावं, असं म्हणत सेलिब्रिटी पालकांमुळे त्यांना त्रास का व्हावा असा, प्रश्नही त्याने उपस्थित केला. त्यांच्या मनाला वाटेल तसं ते वागती. प्रत्येक वेळी सेलिब्रिटींप्रमाणेच ते नाही बाहेर येत असं म्हणत असे प्रसंग निराशाजनक असल्याची बाब त्याने अधोरेखित केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार आणि चाहत्यांमध्ये असणारं अंतर कितीही कमी झालं असलं तरीही ही परिस्थिती कलाकारांसाठी काही नव्या अडचणींना निमंत्रण देणारी ठरत आहे हे नाकारता येणार नाही.