बिग बी यांनी दिला बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावरील चित्रपटाची घोषणा बिग बी अमिताभ बच्चन आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 21, 2017, 09:12 PM IST
बिग बी यांनी दिला बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा  title=

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावरील चित्रपटाची घोषणा बिग बी अमिताभ बच्चन आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. 

यावेळी बिग बी अमिताभ यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. माझ्या कठिण प्रसंगी बाळासाहेब माझ्यासोबत नसते तर.... असं म्हणतं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. या ठाकरे सिनेमाच्या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी बाळासाहेबांसोबतच्या आठवणी ताज्या केल्या आणि सिनेमाला भरभरून शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रमाच्यावेळी काय म्हणाले अमिताभ बच्चन? 

बाळासाहेब ठाकरे मला अनेक कार्यक्रमात बोलवत असतं. आज तुम्ही त्यांच्यावर आधारित सिनेमाच्या या कार्यक्रमाला मला बोलवलतं उद्धवजी मी तुमचा खूप आभारी आहे. हा कार्यक्रम बाळासाहेबांशी संबंधित आहे तर मला इथे यायचं होतं. बाळासाहेबांवर हा सिनेमा आधारित आहे. त्यांचं चरित्र, त्यांचा आतापर्यंतचा संपूर्ण प्रवास या सिनेमात आहे. अमिताभ बच्चन यांनी सिनेमाचे निर्माते संजय राऊत यांना विनंती केली की, तुम्ही हा सिनेमा फक्त 3 तासांचा करू नका. बाळासाहेबांचं जीवन हे 3 तासात पूर्ण होणार नाही. त्यामुळे मी अशी इच्छा व्यक्त करतो की, त्याच्या अनेक सिरिज तयार करा. त्याच्या 10 -12 सिरिज करा. तीन तीन तासाचे एपिसोड करा. आता वेब सिरिज चालतात. त्यामुळे ही प्रार्थना आहे की, त्याचं व्यक्तिमत्व 3 तासात नका सांगू. बाळासाहेबांसमोर माझं कायम कौटुंबिक संबंध राहिला आहे. जेव्हापासून मी त्यांना भेटलो आहे तेव्हापासून आमचं खूप जवळचं नातं राहिलं आहे.

बाळासाहेब मला वडिलांप्रमाणे 

40 वर्षापूर्वी मला त्याचा अनुभव आला. माझं लग्न तेव्हाच झालं होतं, तेव्हा त्यांनी मला फोन केला की, मला तुमच्या पत्नीला भेटायचं आहे. तेव्हा मी आणि जया मातोश्रीवर गेलो. तेव्हा आईंनी माझं आणि जयाचं असं स्वागत केलं. खरंच असं वाटलं त्या आपल्या सुनेचं स्वागत करत आहेत. त्या दिवसापासून मला विश्वास बसला की, बाळासाहेब हे माझ्या पित्याप्रमाणे आहेत. आणि तेव्हापासून आमचं हे नातं आहे. 

तेव्हा बाळासाहेब नसते तर... 

1982 मध्ये कुली सिनेमाच्यावेळी मी जखमी झालो तेव्हा मी बेशुद्धावस्थेत होतो तेव्हा मला मुंबईत आणण्याचा निर्णय घेतला. विमानाने मला मुंबईत आणण्यात आले. तेव्हा मला एअरपोर्टवरून एकही अॅम्बुलन्स मिळाली नाही पण बाळासाहेबांची शिवसेना अॅम्बुलन्स मला त्यावेळी घ्यायला आली आणि तिने मला ब्रिजकँडीमध्ये अॅडमिट केलं. आणि यासाठी मी कायम कृतज्ञ राहिन. 

बाळासाहेब माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले 

माझ्या जीवनात अनेकदा अशा घटना आल्या जेव्हा खूप वेळा माझ्यावर आरोप लावले जात असतं. तेव्हा बाळासाहेब हक्काने मला फोन करत आणि विचारणा करत. एका प्रसंगात देखील त्यांनी असेच केले मला समोर बसवून खरं काय आहे हे ओळखलं आणि माझी बाजू घेतली. तेव्हा त्यांनी माझी साथ दिली म्हणून माझ्या मनात त्यांच्याबद्दल भरपूर आदर आहे. 

बाळासाहेबांच्या शेवटच्या क्षणी 

बाळासाहेबांच्या अखेरच्या दिवसांमध्ये मी त्यांना भेटायला गेलो. ही संधी मला उद्धवजी ठाकरेंनी दिली.  त्यावेळी माझ्यासोबत आदित्य ठाकरे होते. एका व्यक्तीला आपण ज्याला इतकं प्रबळपणे पाहिलं ती आता काहीच बोलत नाही. हे दृश्य मला खूप असह्य झालं. आम्ही प्रार्थना करत होतो की काही तरी बदलेल पण तसं काही झालं नाही. 

बाळासाहेब अमिताभ बच्चन यांच्यावर किती प्रेम करत ?

शेवटच्या दिवसांमध्ये मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो तेव्हा बाळासाहेबांच्या डाव्या बाजूला माझा फोटो होता. तो क्षण पाहून मी खूप स्तब्ध झालो. मी त्यांच्यासाठी किती महत्वाचा आहे हे त्यावेळी माझ्या लक्षात आलं. आणि मी तो क्षण माझ्यासोबत कायम ठेवला आहे. मला खूप आश्चर्य वाटतं की एवढी महान व्यक्ती मला आपल्या कुटुंबातील एक मानत होते यासाठी मी त्यांच्या कायम ऋृणी राहणार आहे.