Amitabh Bachchan Birthday : हिंदी कलाजगतामध्ये महानायक अशी ओळख असणारे अभिनेते अमिताभ बच्चन यंदाच्या वर्षी त्यांचा 81 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. इथं संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि चाहतावर्ग या काळ गाजवणाऱ्या अभिनेत्याच्या वाढदिवसाच्या तयारीला लागला असतानाच तिथं काही मंडळींनी त्यांना एक खास Surprise देत आश्चर्यचकितही केलं आहे. आपल्यापोटी इतरांनी व्यक्त केलेलं हे प्रेम पाहून बिग बिंनाही अश्रू थांबवणं शक्यच झालं नाही.
'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) च्या संपूर्ण टीमनं बिग बींसाठी काहीतरी खास बेत आखल्याचं कार्यक्रमाच्या एका प्रोमोवरूनच पाहायला मिळत आहे. सर्वांनी मिळून केलेले हे प्रयत्न आणि मनापासून दिलेल्या शुभेच्छा पाहताना बच्चन यांनाही गहिवरून आलं आणि एखाद्या लहान मुलानं जसं रडावं अगदी तसेच अमिताभ बच्चन रडू लागले. डोंगराएवढी मोठी कारकिर्द असणाऱ्या या कलाकाराला असं रडताना पाहून तिथं असणाऱ्या चाहत्यांचेही डोळे पाणावले.
असीमित प्रेम देणाऱ्या चाहत्यांना आणि कलाकार मित्रांना धन्यवाद म्हणताना बिग बी म्हणाले, 'आता आणखी किती रडवणार? पुरे आता..' केबीसीमध्ये एखाद्या स्पर्धकाच्या जीवनाविषयी जाणून घेताना बिग बी तिथं आधारवड होताना दिसतात. याचाच संदर्भ देत, 'मी नेहमी इतरांना अश्रू टीपायला टिश्यू देतो आज माझीच वेळ आली' असंही ते म्हणाले. या मंचावर माझा वाढदिवस कायमच उत्तम पद्धतीनं साजरा केला जातो असं म्हणत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
केबीसीच्या मंचाचं अमिताभ बच्चन यांच्याशी एक खास नातं कायमच पाहायला मिळालं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते गेली कित्येक वर्ष छोट्या पडड्याच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. मागच्या वर्षीही या मंचावर त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यावेळी पत्नी जया बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन यांनी बिग बींना तिथं येत आश्चर्यचकित केलं होतं. त्यावेळी ऐश्वर्या राय बच्चन, आराध्या बच्चन , अगस्त्य नंदा या कुटुंबीयांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
11 ऑक्टोबर 1942 ला अलाहबाद येथे अमिताभ बच्चन यांचा जन्म झाला होता. 70 च्या दशकात हिंची चित्रपट विश्वामध्ये त्यांच्याच नावाजा गाजावाजा पाहायला मिळाला. 'जंजिर', 'दीवार', 'शोले' या चित्रपटांसोबतच जवळपास 5 दशकांच्या कारकिर्दीमध्ये बच्चन यांनी 200 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आणि प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवलं.