भाऊ कदम याबाबत ठरला नाही 'नशिबवान'

 ...यामुळे मराठी सिनेमांची गळचेपी होत आहे

Updated: Jan 17, 2019, 01:50 PM IST
  भाऊ कदम याबाबत ठरला नाही 'नशिबवान' title=

मुंबई : मराठी सिनेमांची गळचेपी होती. मराठी सिनेमांना प्राईम टाइमचे शो काय? तर प्रदर्शनासाठी थिएटर्सच मिळत नाही हा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. याचं कारण म्हणजे महाराष्ट्राचं भरभरून मनोरंजन करणारा अभिनेता भाऊ कदम याची हतबल पोस्ट. झी मराठीच्या 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय शोच्या माध्यमातून भालचंद्र कदम म्हणजे आपला लाडका भाऊ कदम प्रत्येकाच्या घराघरात पोहोचला. विनोदी भूमिकांप्रमाणेच भाऊने आतापर्यंत वेगवेगळ्या सिनेमांच्या माध्यमातून सामान्यांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या भूमिका साकारल्या. नुकताच भाऊ कदमचा 'नशिबवान' हा सिनेमा प्रदर्शित झाला. पण या सिनेमाला थिएटर्स न मिळाल्याची खंत भाऊने व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात मराठी सिनेमांच्या प्रदर्शनाकरता एवढा खडतर प्रवास करावा लागतो. पण इतर भाषेतील सिनेमे आणि बॉलिवूडला अगदी सहज थिएटर उपलब्ध होतात. यामुळे मराठी सिनेमांची गळचेपी होत आहे. भाऊ कदमने शेअर केलेल्या या भावनिक पोस्टमध्ये मराठी सिनेमांची व्यथा स्पष्ट होत आहे. ज्या डोंबिवलीचा भाऊ कदमला अभिमान आहे तेथे 'नशिबवान' या सिनेमाला एकही थिएटर न मिळाल्याची खंत भाऊने व्यक्त केली आहे.

वाचा ही पोस्ट...

भाऊ कदमची मुख्य भूमिका असलेला 'नशिबवान' हा सिनेमा 11 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमात भाऊ कदमने महानगरपालिकेच्या एका सफाई कर्मचाऱ्याची भूमिका साकारली आहे. या सिनेमात भाऊ कदमसोबतच मिताली जगताप - व्हराडकर, नेहा जोशी आणि जयवंत वाडकर सारखे कलाकार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अमोल गोळे यांनी केलं आहे. या सिनेमातून संपूर्ण महाराष्ट्राची साफसफाई करणाऱ्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि त्यांच जीवन यामधून उलगडलं आहे. आणि याच सिनेमाला थिएटर्सने नाकारलं असल्याची गोष्ट समोर आली आहे. बॉलिवूड सिनेमांमुळे कायमच मराठी सिनेमांना डावलण्यात येतं तसेच आता इतर भाषिक सिनेमांना देखील महाराष्ट्रात शो मिळतात. मग फक्त मराठी सिनेमांवर ही परिस्थिती का? असा सवाल भाऊ कदम यांनी या पोस्टमधून विचारला आहे.