भरत जाधव आणि गौरव मोरे यांचा Landon Misal चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Landon Misal Release Day : भरत जाधव आणि गौरव मोरे यांची जोडी आता आपल्याला पाहायला मिळणार 'लंडन मिसळ' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 25, 2023, 06:47 PM IST
भरत जाधव आणि गौरव मोरे यांचा Landon Misal चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला title=
(Photo Credit : PR Handover)

Landon Misal Release Day : ए बी इंटरनॅशनल, म्हाळसा एंटरटेनमेंट आणि 'लंडन मिसळ' लिमिटेड प्रस्तुत तसंच जालिंदर कुंभार दिग्दर्शित 'लंडन मिसळ' हा चित्रपट येत्या 8 डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. भारतात तसेच लंडनमध्ये शूट झालेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांनी भरत जाधव एका मोठ्या अन् महत्त्वपूर्ण भूमिकेत पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना सरप्राईज देणाऱ्या भरत जाधव यांनी पहिल्यांदाच चित्रपटासाठी रॅप गायन देखील केलं आहे.  श्री. रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून 'लंडन मिसळ' हा चित्रपट प्रेरित आहे, हे या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य. 
 
'लंडन मिसळ' या चित्रपटाचे निर्माते अमित बसनेट, सुरेश गोविंदराय पै आणि आरोन बसनेट आहेत तर  सह-निर्माते सानिस खाकुरेल आहेत. दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे,  तर सह-दिग्दर्शन वैशाली पाटील यांनी केले आहे.पटकथा-संवाद ओमकार मंगेश दत्त यांचे आहेत. वैशाली सामंत,रोहित राऊत,वैष्णवी श्रीराम यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे तर 'बाईपण भारी देवा' चित्रपटाच्या संगीताच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या साई-पियुष या संगीतकारांच्या जोडीनं 'लंडन मिसळ' चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक केलं आहे. तसेच, चित्रपटाची गाणी मंदार चोळकर, मंगेश कांगणे आणि  समीर सामंत यांनी लिहिली आहेत. वैशाली सामंत, भरत जाधव, राधा खुडे, मुग्धा कऱ्हाडे, वैष्णवी श्रीराम यांच्या सुमधुर आवाजातील गाणी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : 33 वर्षांनी अमिताभ आणि रजनीकांत येणार एकत्र; थलायवा पोस्ट शेअर करत म्हणाले 'माझे मेन्टॉर....'

चित्रपटात ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, माधुरी पवार, गौरव मोरे, निखील चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि सुनील गोडबोले हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत तर भरत जाधव एका हटके भूमिकेत प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करताना दिसणार आहेत आणि ही प्रेक्षकांसाठी मोठी मेजवानी असेल. आदिती आणि रावी या लंडनमध्ये राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींची ही कथा आहे. आपल्या बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेक अडी-अडचणींचा  सामना करावा लागतो,आणि त्यावेळी ज्या दिव्यातून त्यांना जावं लागतं त्याची कथा म्हणजे लंडन मिसळ. नाटक, अभिनय, संगीत, नृत्य, खळखळून हसवणारे विनोद आणि झणझणीत मिसळ याची जुगलबंदी आपल्याला या चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे.चित्रपटाचे डिस्ट्रिब्युशन  फ़िल्मअस्त्रा स्टुडिओज करत आहेत .