सेल्फीसाठी चाहत्यांची झुंबड; कतरिनाने असा साधला सुवर्णमध्य....

व्हायरल होत आहे याविषयीचा एक व्हिडिओ 

Updated: Jul 2, 2019, 12:44 PM IST
सेल्फीसाठी चाहत्यांची झुंबड; कतरिनाने असा साधला सुवर्णमध्य....  title=

मुंबई : सेलिब्रिटी म्हटलं म्हणजे त्यांच्याभोवती चाहत्यांची गर्दी आलीच. आपल्या आवडीच्या कलाकारासोबत एक फोटो काढण्याचा असंख्य चाहत्यांचा प्रयत्न असतो. पण, अनेकदा परिस्थिती बिघडते. चाहते हे आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक असल्याचं समजत सेलिब्रिटी कायमच त्यांच्यासोबत फोटो काढत त्यांनाही काही आठवणी देतात. पण, अनेकदा याच सेलिब्रिटींना अडचणीच्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. 

नवी दिल्ली विमानतळावर 'भारत' फेम अभिनेत्री कतरिना कैफलाही सध्या अशाच प्रसंगांचा सामना करावा लागला आहे. सोशल मीडियावर याविषयीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये कतरिनासोबत सेल्फी काढण्यासाठी म्हणून चाहते गर्दी करताना दिसत आहेत. तिच्यासोबतच्या अंगरक्षकांनाही न जुमानता हे चाहते एका सेल्फीसाठी इतका आटापिटा करताना दिसत आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता, 'आराम से... वहाँ से करो...' असं अतिशय शांतपणे ती सांगताना दिसत आहे. चाहत्यांना निराश न करण्यासाठी तिने घेतलेला हा निर्णय आणि त्यातही सुरक्षा रक्षकांना कोणताही त्रा होऊ नये यासाठी तिने घेतलेली काळजी पाहता खऱ्या अर्थाने तिने सुवर्णमध्यच साधला, असं म्हणायला हरकत नाही. 

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहता त्या प्रसंगी कतरिनाने ज्या सहजपणे परिस्थिती सांभाळली हे पाहता अनेकांनीच तिची प्रशंसा केली आहे. चाहत्यांना सेलिब्रिटींविषयी वाटणारं कुतूहल ही काही नवी बाब नाही. पण, कित्येकदा याच चाहत्यांकडून काही मर्यादांचं उल्लंघन केलं जातं, परिणामी खासगी आयुष्यात होणारा हा शिरकाव पाहता सेलिब्रिटींचीही तारांबळ उडते हे खरं.