अर्जुनसोबतच्या नात्यावर मलायकाच्या मुलाची प्रतिक्रिया

त्याला याविषयीची महिती मिळताच.... 

Updated: Jul 2, 2019, 12:09 PM IST
अर्जुनसोबतच्या नात्यावर मलायकाच्या मुलाची प्रतिक्रिया  title=

मुंबई : मॉडेल आणि अभिनेत्री मलायका अरोरा ही सध्याच्या घडीला चर्चेत आहे ते म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबतच्या तिच्या नात्यामुळे. ४३ वर्षीय मलायका तिच्याहून वयाने जवळपास ९ वर्षे लहान असणाऱ्या अर्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यांच्या या नात्याविषयी माहिती मिळताच चाहत्यांना धक्का बसला होता. याबाबतच्या बऱ्याच संमिश्र प्रतिक्रियाही पाहायला मिळाल्या होत्या. त्यातच आता मलायकाच्या मुलाची या साऱ्याविषयी नेमकी काय प्रतिक्रिया होती याचा उलगडा खुद्द मलायकाने केला आहे. 

'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत तिने याविषयीची माहिती दिली. अर्जुनसोबतच्या नात्याची अरहानला माहिती होण्यापासून वयातील अंतरामुळे होणाऱ्या चर्चांपर्यंत सर्वच बाबतीत तिने या मुलाखतीत काही गोष्टी स्पष्ट केल्या. 

अरहान हा मलायका आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान यांचा मुलगा. १६ वर्षीय अरहानला ज्यावेळी त्याच्या आईच्या या नात्याविषयी माहिती मिळाली तेव्हा तो कसा व्यक्त झाला हा प्रश्न अनेकांनाच पडला होता. ज्याचं उत्तर देत मलायका म्हणाली, 'माझ्या मते कोणत्याही प्रसंगाला सामोरं जाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रामाणिकपणा. तुमच्या आयुष्यात नेमकं काय सुरु आहे याविषयी जवळच्या व्यक्तींना माहिती असलीच पाहिजे. शिवाय त्यांना त्या गोष्टी समजण्यासाठी अपेक्षित वेळ आणि गोष्टींची मिळतंजुळतं करण्यासाठीचा काळ दिला जाणंही तितकंच महत्त्वाचं आहे'. 

आम्ही या विषयावर बोललो आणि मला आनंद आहे की सर्वांनीच मोठ्या आनंदाने या गोष्टींचा स्वीकार केला. अधिक प्रामाणिकपणे या साऱ्याला सामोरे गेल्याचं म्हणत मुलाने या नात्याचा स्वीकार केला असून, त्याला या नात्याची कोणतीही अडचण नसल्याचं तिने स्पष्ट केलं. 

पुन्हा प्रेम परतण्याचा आनंद 

पहिल्या लग्नाच्या नात्याला तडा गेल्यानंतर अशा प्रकारे पुन्हा एकदा प्रेमाची चाहूल लागणं हे फार आनंददायी असल्याचंही मलायका म्हणाली. 'हे खरंच खूप सुरेख आहे. माझ्या लग्नाच्या नात्यात दुरावा आला तेव्हा एका दुसऱ्या नात्याचा मी विचारही केला नव्हता. प्रेमभंगाच्या भितीने मनात घर केलं होतं. पण, हो प्रेमाची चाहूल लागावी, एक नवं नातं आकारास यावं असं मलाही वाटत होतं. या साऱ्या परिस्थितीत मला आत्मविश्वास मिळाला', असं म्हणत तिने भावना व्यक्त केल्या 

वयातील अंतराने कधीच डोकं वर काढलं नाही 

अर्जुन आणि मलायकाच्या वयात ९ वर्षांचं अंतर आहे. पण, वयातील हे अंतर कधीच नात्यात डोकं वर काढत नसल्याचं तिने स्पष्ट केलं. 

'एखाद्या व्यक्तीसोबत जेव्हा तुम्ही नात्यात असता तेव्हा, वयात असणारं अंतर कधीही डोकं वर काढत नाही. कारण या साऱ्यामध्ये मन आणि बुद्धी जोडलेले असतात', असं मलायका म्हणाली. समाजाच्या विचारसरणीला इथे तिने अधोरेखित करत आपल्याहून वयाने लहान मुलीवर मुलगा प्रेम करतो यात समाजाला काहीच वावगं वाटत नाही. पण, जेव्हा एखादी मुलगी, महिला तिच्याहून वयाने लहान मुलावर प्रेम करते त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असते तेव्हा मात्र तिला 'अतिउत्साही' आणि 'म्हातारी' म्हणून हिणवण्यात येतं, हा मुद्दा मांडल मलायकाने वस्तुस्थितीत सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. 

 
 
 
 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

अर्जुन आणि मलायका येत्या काळात लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण, या मुलाखतीत मलायकाने त्याविषयी फार काही माहिती देण्यास नकार दिला. ही अत्यंत खासगी बाब असल्याचं म्हणत तिने यासंबंधीच्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं.